कलेतून व्यवसायाची भरारी

नागवेकर कुटुंबाचे कस्टमाईझ अंतरपाट; देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात मागणी

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील नागवेकर कुटुंबाने आपल्या कलेच्या जोरावर व्यवसायाची नवी दिशा निर्माण केली आहे. त्यांनी लग्नसोहळ्यांतील महत्त्वाचा घटक असलेल्या अंतरपाटाला ‌‘कस्टमाईझ‌’ स्वरूप देत आज देशासह विदेशातही आपली ओळख निर्माण केली आहे.

कोणताही सण वा लग्नसोहळा अधिक आकर्षक आणि लक्षवेधी बनवण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध असतात. मात्र, उरणमधील सिद्धार्थ नागवेकर यांनी आपल्या चित्रकलेच्या जोरावर अंतरपाट तयार करण्याची अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. मित्रांच्या लग्नासाठी तयार केलेल्या अंतरपाटाचा व्हिडीओ त्यांचा लहान भाऊ सोमील नागवेकर यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांच्या या कलेचे व्यवसायात रूपांतर झाले.

या व्यवसायात संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असून प्रत्येक सदस्य आपापली जबाबदारी पार पाडत आहेत. सिद्धार्थ नागवेकर अंतरपाटावर चित्रांकन करतात, तर त्यांचे वडील राजेश नागवेकर सुंदर कॅलिग्राफीद्वारे नावे लिहितात. आई अंतरपाटाला शिवणकाम व सजावटीची जबाबदारी सांभाळते, तर भाऊ सोमील सोशल मीडियावर व्हिडीओ तयार करून प्रसिद्धीचे काम पाहतो. नागवेकर कुटुंबाने ग्राहकांच्या मागणीनुसार विविध भाषांमध्ये अंतरपाट तयार करणे, दोन्ही बाजूंनी नावांची मांडणी, आकर्षक डिझाईन आणि वेळेत डिलिव्हरी या वैशिष्ट्यांमुळे या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजच्या तरुणांनी मोबाईलपुरते मर्यादित न राहता आपल्या अंगी असलेल्या कलेचा उपयोग करून त्याचे व्यवसायात रूपांतर केल्यास यश मिळू शकते, असे मत सिद्धार्थ नागवेकर यांनी व्यक्त केले आहे. कलेला व्यवसायाची जोड देत उरणच्या नागवेकर कुटुंबाने उंच भरारी घेतली असून, स्थानिक तरुणांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत.

सध्या आम्ही कस्टमाईझ अंतरपाट तयार करून ग्राहकांच्या आवडीनुसार विविध डिझाईन साकारत आहोत. विशेष म्हणजे महाराष्ट्राबरोबरच इतर राज्ये तसेच परदेशातूनही त्यांच्या अंतरपाटांना मागणी येत आहे.

– सिद्धार्थ नागवेकर

Exit mobile version