बचत गटाच्या महिलांच्या मेहनतीचे फळ; मशरूम उत्पादनाचा यशस्वी प्रयोग
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यात येणाऱ्या नवनवीन प्रकल्पांमुळे शेती विकून झटपट पैसा मिळेल म्हणून तरुणांनी शेतीकडे दुर्लक्ष करून, शेतीची विक्री करण्याचा मार्ग अवलंबिला आहे. त्यातच वाढलेली महागाई, मजुरांची कमतरता, निसर्गाचा लहरीपणा, उत्पादनात शाश्वती नसणे या सर्व बाबींमुळे शेतीला दुय्यम स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे शेतीला उतरती कळा लागली आहे. अशातच काही शेतकरी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक अधिकारी यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत त्यांचा हा प्रयोग चिरनेर गावातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा ठरला आहे.
उरण तालुक्यातील कृषी अधिकारी अर्चना सुळ नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक अधिकारी सुषमा अंबुलगेकर यांच्या विशेष पुढाकारातून आणि चिरनेरमधील बचत गटाच्या महिलांच्या मेहनतीतून मशरूमच्या शेतीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. या अनुषंगाने आत्मा योजनेअंतर्गत महिलांना मशरूम उत्पादनासाठी आवश्यक साहित्य देऊन, मार्गदर्शन करण्यात आले. ही योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रयोगातून यशस्वी करून दाखविली आहे. याचे श्रेय अर्चना सुळ नारनवर व सुषमा अंबुलगेकर या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चिरनेर येथील बचत गटाच्या सोनाली जाधव, अंजली चिर्लेकर, ज्योती म्हात्रे, सुकन्या रसाळ, नेहा फोफेरकर, निर्मला भोईर, प्रणिता मोकल, रेवती ठाकूर, बिंदिया म्हात्रे व कामिनी हातनोलकर या सहभागी महिलांना जाते. या महिलांनी दिलेल्या संधीचे सोने केले आहे. प्रशिक्षण, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी मशरूम उत्पादनात समाधानकारक यश मिळवले आहे. स्वकष्टातून त्यांनी आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे. हे त्यांच्या आत्मविश्वासाचे आणि कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या कामातून स्वावलंबन, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव स्पष्टपणे दिसून येते. या योजनेच्या यशामागे महिलांची सकारात्मक वृत्ती, शिकण्याची तयारी आणि त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत.
बचत गटाच्या महिलांनी केलेले काम पाहून मला वैयक्तिक पातळीवरही मोठे समाधान मिळाले आहे. रायगडच्या आत्म्याच्या प्रकल्प संचालक वंदना शिंदे यांनी केलेली विशेष मदत, तसेच कृषी सहाय्यक अधिकारी सुषमा अंबुलगेकर यांनी बचत गटाच्या महिलांना प्रत्येक टप्प्यावर केलेले मार्गदर्शन व घेतलेले विशेष परिश्रम यामुळे हा महिलांना आर्थिक उत्पादनासाठी नवसंजीवनी देणारा प्रयोग यशस्वी झाला आहे. भविष्यातही अशाच प्रकारे त्या नवनवीन प्रयोग करत राहतील. आणि समाजाची प्रगती साधतील याची मला खात्री वाटते. हे काम ग्रामीण विकासासाठी प्रेरणादायी आहे.
-अर्चना सुळ नारनवर,
कृषी अधिकारी,
उरण
हा प्रयोग करण्यासाठी मोठे चॅलेंज होते. अडचणी होत्या, पण केवळ शेतकऱ्यांची प्रगती साधण्यासाठी, मी एक कृषी सहाय्यक अधिकारी म्हणून पुढाकार घेऊन, या मशरूमचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. हा प्रयोग 22 दिवसांचा आहे. शेतकऱ्यांकडे सहज उपलब्ध होणाऱ्या पेंढ्याच्या भुशाचा या मशरूमच्या प्रयोगासाठी वापर केला जातो. मधुमेय व ह्दयविकार यासारख्या आजारांवर मशरूमची भाजी अत्यंत गुणकारी आहे. भाजी चविष्ट असून ती हेल्दी आहे. हा प्रयोग शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारा आहे.
-सुषमा अंबुलगेकर,
कृषी सहाय्यक अधिकारी
