भारतीय क्रिकेट संघाचा भरगच्च दौरा

वर्षभर अनेक देशांशी होणार सामने

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आयपीएल संपल्या संपल्या भारतीय संघाचा पुन्हा एकदा भरगच्च क्रिकेट दौरा सुरु होणार आहे. त्यामुळे वर्षभर क्रिकेटपटू घराबाहेरच राहणार आहेत.

इंडियन प्रीमियर लीगचा थरार 31 मार्चपासून सुरू होत आहे. इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटी होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारताला आशिया कप खेळायचा आहे. मात्र, आता बीसीसीआयने संघाच्या योजनेत थोडा बदल केला आहे. आयपीएल संपल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर भारत वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर जाणार आहे, परंतु त्याआधी जुलै-ऑगस्टमध्ये होणार्‍या या दौर्‍यात थोडा बदल करण्यात आला आहे. भारताला या दौर्‍यात 2 कसोटी सामने, 3 टी-20 सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळायचे होते पण आता त्यात बदल झाला आहे.

आता हा दौरा 10 सामन्यांचा झाला आहे. या दौर्‍यावर होणार्‍या 3 टी-20 सामन्यांऐवजी आता एकूण 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे. याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. भारताचा वेस्ट इंडिज दौरा जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे, तर येत्या काही दिवसांत या दौर्‍यावर कोणता सामना होणार याची संपूर्ण माहिती समोर येणार आहे. 10 सामन्यांचा दौरा संपल्यानंतर, संघ 3 टी-20 खेळण्यासाठी ऑगस्टच्या तिसर्‍या आठवड्यात आयर्लंडला जाणार आहे. खुद्द क्रिकेट आयर्लंडनेच ही माहिती दिली.

Exit mobile version