बळीराजाच्या शिवारात फुलला मोत्याचा दाणा

नैसर्गित आपत्तीवर मात करीत पिकविले जित्राब
। अलिबाग । सायली पाटील ।
कधी धो धो कोसळणारा….तर कधी ओढ लावणारा…तरीही न डगमगता काळ्या आईची नितांत सेवा करणार्‍या बळीराजाच्या शिवारात यावर्षीही मोत्याचे पीक फुलले आहे. आता हे शिवाराती धन घरात आणण्याची घाई सुरु झालेली आहे. संकटाची मालिका अजूनही संपलेली नसल्याने शेतकर्‍यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. रायगड जिल्हा हा भाताचा कोठार म्हणून उभ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरण झपाट्याने वाढत असले तरी अजूनही रायगडात शेती हाच मुख्य व्यवसाय मानला जात आहे.

मजुरांची कमतरता
सध्या शेतात भात तयार झाल्याने बरेच ठिकाणी बळीराजा भात कापणीत व्यस्त झाला आहे. मात्र शेतमजुरांच्या कमतरतेमुळे आजही शेतीची कामे खोळंबली असल्याचे तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे. शेतात तयार झालेल्या पीकाने बळीराजा जरी सुखावला असला तरीही डोक्यावर असणार्‍या परतीच्या पावसाच्या टांगत्या तलवारीमुळे शेतकर्‍यांच्या मनातील धास्ती अजूनही कायम आहे. परतीचा पाऊस हा शेतात कष्टाने उभारलेल्या डोलार्‍याला क्षणार्धात होत्याचं नव्हतं करेल की काय? अशी भीती सध्या सर्वच शेतकर्‍यांमध्ये पाहायला मिळत आहे.

उत्पादन क्षेत्र घटले
गेल्या 3-4 वर्षांची सरासरी पाहता संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार हेक्टर इतके क्षेत्र हे लागवडीखालील असून सध्या चालू वर्षात 94 हजार 327 हेक्टर इतक्या क्षेत्रामध्ये लागवड झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील उत्पादन क्षेत्र कमी झाल्याचे जाणवत आहे.

एकीकडे पीकांवर लागणार्‍या किडींमुळे यंदा फारसे नुकसान झाले नसल्याने शेतकर्‍यांची चिंता जरी कमी झाली होती परंतु, दुसरीकडे वादळ आणि अवकाळी पाऊस याने झालेल्या शेतीच्या नुकसानामुळे जवळपास सगळच उद्ध्वस्त झाल्याचं चित्र दिसत आहे. शेतीचे नुकसान झाल्यास अनेक योजना तसेच इन्श्युरन्सेस उपलब्ध असल्याची व त्या सर्व योजना तसेच इन्श्युरन्सेस शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवून त्यांना त्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी कृषीविभाग प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक उज्वला बाणखेले यांनी कृषीवलशी बोलताना दिली.

रब्बीची लागवड करा
रायगडातील सर्वच शेतकर्‍यांनी अवकाळी पाऊस आणि ओढावणार्‍या नैसर्गिक आपत्तींमुळे आर्थिकदृष्ट्या उद्भवणार्‍या संकटांवर रडत बसण्यापेक्षा त्यावर उपाय म्हणून रब्बी पीकांकडे लक्ष देणे आता जास्त गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या शेतकर्‍यांकडे आधीच सर्व कच्चा माल उपलब्ध आहे. परंतु त्याचा उपयोग शेतकर्‍यांनी बिझनेससाठी करणे गरजेचे आहे. आपण त्याचा नीट वापर न केल्याने बाकीचे लोक त्याचा मोठा बिझनेस उभा करत आहेत. ही अतिशय खेदजनक बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्या रायगडातील शेतकरी हा पिकवलेली भाजी किंवा पिकवलेलं धान्य हे फक्त कुटुंबापुरतं मर्यादित ठेवतो किंवा लगेचच विक्रेत्यांना विकून टाकतो. परंतु, त्यातून काही मोठं करता येईल याचा विचार करत नाही. म्हणून शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.
बाराही महिने झाडावर येणारा नारळ सुकेपर्यंत वाट बघत बसण्यापेक्षा त्याला जर आधीच सुकवला तर सुक्या खोबर्‍याची बाजारातील वाढती मागणी पाहता मोठ्या प्रमाणात उद्योग उभा राहू शकतो.

हातचं सोडून पळत्याच्या मागे
जिल्हा अधिक्षक कृषीअधिकारी, उज्ज्वला बाणखेले या अलिबागमधील एका हॉटेलमध्ये गेल्या असता तिथे त्यांनी कल्पवृक्षाच्या झाडांपासून बनविलेल्या शोभिवंत वस्तु टांगलेल्या पाहिल्या असता त्यांनी फार उत्सुकतेने तिथल्या हॉटेल मालकाला या वस्तु कुठून आणल्याचे विचारले असता या वस्तु अ‍ॅमेझॉनवरून आणल्याचे सांगितले. याबाबतीत त्यांच्याशी संवाद साधला असता आपल्या शेतकर्‍यांकडे आधीच सर्व कच्चा माल उपलब्ध असतानादेखील आपण त्याचा नीट वापर न केल्याने बाकीचे लोक त्याचा मोठा बिझनेस उभा करत आहेत. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Exit mobile version