आदिवासी विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास

| ठाणे | प्रतिनिधी |

मुरबाड तालुक्यातील फांगुळगव्हाण, मोरोशी या आदिवासी वाड्यांमधील शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कंबरभर पाण्यातून वाट शोधावी लागत होती. हा धोकादायक प्रवास टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सरकारकडे वेळोवेळी विनंती करुनही आदिवासींच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आदिवासी बांधव एकत्र येत लोकवर्गणीतून वाहत्या नाल्यावर लाकडी पूल तयार करून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सुरक्षित रस्ता तयार करण्यात आला होता.

मुरबाड तालुका हा विकासाचे दृष्टीने एक आगळेवेगळे मॉडेल म्हणून ओळखला जात असला तरी आदिवासी बांधव सुरक्षित रस्ते, शैक्षणीक सुविधा आरोग्य या मुलभूत सुविधांपासून लांब असल्याचे समोर आले आहे. मुरबाड नगर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या फांगुळगव्हाण व मोरोशी दरम्यान वाहणाऱ्या मोठ्या नाल्यातून शाळकरी विद्यार्थी हे कमरभर पाण्यातून वाट शोधत असताना हे दृश्य वेळोवेळी लोकप्रतिनिधी, शासनाचे निदर्शनास आणून दिले आहे. त्या ठिकाणी छोटासा साकव तरी तयार करून परिसरातील आदिवासी बांधवांची, चाकरमान्यांची तसेच शाळकरी विद्यार्थ्याची समस्या सोडवावी, अशी याचना वर्षानुवर्षे येथील आदिवासी बांधव करत असताना एकदाही त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. शेवटी आपला रस्ता आपणच करण्याचा आदिवासी बांधवांनी निर्णय घेतला आणि लोक वर्गणीतुन पैसे जमा करुन त्या नाल्यात दगडगोट्यांचे बुरुज तयार करुन त्याला चारही बाजूंनी लाकडांचा आधार देण्यात आला. या नाल्यावर शंभर ते दिडशे फुटांचा साकव तयार करण्यात आला. यामुळे मुरबाडमध्ये कोट्यवधी रुपयांच्या योजना राबविण्यात आल्या असल्या तरी त्या आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचल्या नसल्याचे उघड झाले असून तालुक्यातील विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Exit mobile version