ऑनलाईन व्यवसायाच्या आमिषाने 6.16 लाखांची फसवणूक
| रेवंदडा | प्रतिनिधी |
सोशल मीडियावरून मैत्री करून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत बेलोशी येथील एका व्यक्तीची तब्बल 6 लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, रेवदंडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील 47 वर्षीय परेश गुंड यांची फेसबुक व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ओळख करून घेत अज्ञात महिलेने त्यांना ऑनलाईन व्यवसायातून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल रुपये 6,16,113.40 इतकी रक्कम उकळल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 मार्च ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत संबंधित महिलेने फेसबुकवर मैत्री करून पुढे व्हॉट्सॲप चॅटिंग व व्हॉईस कॉलद्वारे विश्वास संपादन केला. त्यानंतर व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगत तिने एका मोबाईल लिंकद्वारे व्यवहार करण्यास भाग पाडले. सदर लिंकच्या माध्यमातून यूपीआयद्वारे टप्प्या-टप्प्याने एकूण 6,16,113.40 इतकी रक्कम काढून घेण्यात आली. नंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच परेश गुंड यांनी तात्काळ रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे करीत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरून येणाऱ्या अशा आकर्षक गुंतवणूक योजनांपासून नागरिकांनी सावध राहावे, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि आर्थिक व्यवहार करताना योग्य पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
