दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच
| रेवदंडा | प्रतिनिधी |
रेवदंडा समुद्रकिनारी बियर व दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच नित्याने पडत आहे. दरम्यान, फुटलेल्या बाटल्या धोकादायक ठरून येथून जा-ये करणारे जखमी होण्याचे शक्यता आहे. मात्र, आगरकोट किल्ल्यातील बागायतीत बिच टेंटमधील पर्यटक हे रात्री-अपरात्री किनाऱ्यावर येऊन दारू पित असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. बिच टेंन्टच्या अवकृपेने चौपाटीचे विद्रुपीकरण होत असून, स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटक, पै-पाहुण्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रेवदंडा समुद्रकिनाऱ्यालगत आगरकोट किल्ला मालकी बागायत परिसरात बिच टेंन्ट सुविधा काहीनी भाडे तत्त्वावर सुरू केली आहे. समुद्रकिनारी अतिक्रमण करून या टेंन्टची उभारणी केली आहे. याठिकाणी येणारे समुद्रप्रेमी, पर्यटक मंडळी किनाऱ्यावर दारू पिऊन रात्रभर धिंगाना घालत फिरत असतात. दारुच्या बाटल्या इतरस्त्र फेकून समुद्रकिनारा विद्रुप बनवून टाकतात, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या फुटलेल्या बाटल्यांच्या काचा येथून पायी जा-ये करणाऱ्यांना इजा होऊन जखमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिकांना समुद्र चौपाटीवर फिरणे नकोसे झाले आहे. तरी, रेवदंडा आगरकोट किल्ला बागायतीमध्ये मालकीच्या जागेत असलेल्या बिच टेंन्टवर संबंधितांना सक्त ताकीद देण्यात यावी, तसेच रात्री-अपरात्री समुद्रकिनारी फिरण्यास बंदी करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करत आहेत.