रायगडच्या राजकारणातील अभ्यासू, हुशार व सर्वसामान्य कष्टकरी जनतेचे व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे दिग्गज व्यक्तिमत्व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अलिबागचे कार्यक्षम चेअरमन व तरुणांना राजकारणात संधी देणारे एकमेव नेते शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, विधानपरिषदेचे आमदार जयंतभाई पाटील यांचा आज वाढदिवस. त्यांना सुरुवातीलाच कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव व माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षातर्फे वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!
शेकापचे झुंझार नेते म्हणून आ. जयंतभाई पाटील यांची ओळख संपूर्ण रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्यानंतर त्यांचा सामाजिक सेवेचा वसा पुढे नेत आ. जयंतभाई यांनी सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रात आपली सर्वदूर एक विशेष अशी ओळख निर्माण केली आहे. 80 टक्के समाजकारण व फक्त 20 टक्के राजकारण करीत त्यांनी आपल्या कार्याचा प्रभाव सर्वत्र उमटविला आहे. राजकारण करीत असताना रायगड जिल्हा परिषदेवर नेहमीच शेकापचे वर्चस्व राखण्यात ते यशस्वी झाले आहेत. रायगडच्या राजकारणातील अतिशय हुशार व अभ्यासू व्यक्तित्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. ते रायगडवासियांच्या हृदयातील नेते आहेत.
विधानसभा, विधानपरिषदेत अगदी कमी आमदार असतानादेखील विधानपरिषदेचे आमदार म्हणून निवडून येण्याचे कसब आ. जयंतभाईंनी दाखवून दिले आहे. विधिमंडळात आ. जयंतभाई यांचे नाव घेतले की, त्यांच्याकडे लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे हुशार व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून आदराने पाहिले जाते. विधिमंडळातील त्यांचा बुलंद आवाज हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असतो. सार्वजनिक हिताचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, अन्यायविरुद्धचे प्रश्न असतील, अशा विविध प्रश्नांची व समस्यांची सभागृहासमोर अभ्यासपूर्ण अशी आक्रमकपणे मांडणी करून ते विधिमंडळात सभागृहाचे लक्ष वेधून घेतात. विधानपरिषदेचे आमदार म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने गोरगरीब कष्टकरी जनता व गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. सहकार क्षेत्रात आमदार जयंतभाई पाटील यांचे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यात, देशात व सातासमुद्रापलीकडे नाव पोहोचले आहे. सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख सर्वदूर आहे. बँकेत कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता बँकेचा पारदर्शक कारभार कसा सुरु राहील याची योग्य ती खबरदारी घेऊन जयंतभाई बँकेचे कामकाज चेअरमन या नात्याने चांगल्या प्रकारे चालवीत असल्यानेच या बँकेने सातासमुद्रापलीकडे गरुडभरारी घेतली आहे. या बँकेला अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचे सर्व श्रेय आ. जयंतभाईंना जाते.
उद्योग क्षेत्रातही आ. जयंतभाई प्रचंड मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेले व्यक्तिमत्त्व आहेत. समाजाच्या हितासाठी ते नेहमीच चांगले असे मार्गदर्शन करीत असतात. “आधी आपला व्यवसाय सांभाळा व नंतर जसा वेळ मिळेल तसे पक्षाचे काम करा” अशी शिकवण नेहमीच जयंतभाईंची पदाधिकारी, कार्यकर्ते व जवळच्या मित्रांना राहिली आहे. अन्याय व खोट्याची चीड असणारा हा लोकनेता आहे. त्यांना खोटे, चुकीचे व फसवेगिरी कधीच चालत नाही. अशा व्यक्तींना ते कधीच जवळ करीत नाहीत. त्यांचा पक्षातील अथवा इतर कोणत्याही पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्यावर, व्यक्तीवर विश्वास बसला की, त्या कार्यकर्त्याला, व्यक्तीला काही हवे असल्यास परत मागण्याची गरजच भासत नाही. त्यांनी राजकारणात अनेक तरुणांना संधी दिली असून, त्यांच्यामुळेच आज आमच्यासारखे कार्यकर्ते विविध पदांवर काम करीत आहेत. असे हे जनतेच्या हृदयातील व्यक्तिमत्त्व असून, त्यांना दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
– रमेश पांडुरंग मोरे