। अलिबाग । वार्ताहर ।
कारागृहातील बंद्यांना शिक्षा संपवून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा उदरनिर्वाह किंवा समाजात चाकोरीत पुन्हा उभे राहण्यासाठी खूप संकटाना सामोरे जावे लागते. अशी परिस्थिती येऊ नये म्हणून एखादी कला किंवा व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे यासाठी वेगवेगळ्या कला वर्गांचे प्रयोजन आखण्याची एक नवीन संकल्पना कारागृह विभागाचे पोलिस महासंचालक प्रशांत बोरुडे यांनी मांडली आहे. त्यांच्या या संकल्पनेला जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हरळय्या, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी आनंद विद्याधर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने बंदिजनांना विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करून स्वावलंबी बनविण्यासाठी मेहनत घेत आहेत. या वेगळ्या संकल्पनेच्या पहिल्या वर्गाचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते अलिबागेतील हिरकोट कारागृहात करण्यात आला आहे. या आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून जागृती फाऊंडेशनला पर्स मेकिंग आणि शिवणकाम प्रशिक्षण वर्ग चालविण्याची संधी मिळाली आहे. जागृती फाऊंडेशनने आतापर्यंत 4500 महिलांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देऊन महिलांना स्वावलंबी करण्याचे काम करण्यात आले आहे.