दिवसभर अर्ज आणि वितरण व्हावे, नागरिकांची मागणी
| कर्जत | प्रतिनिधी |
जमिनीचे 7/12 उतारे, फेरफार नोंदी, नकाशे यांसारख्या कागदपत्रांच्या ‘नकल’ प्रती मिळवण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयाने ठरवून दिलेल्या विशिष्ट वेळेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी 10 .30 ते 1.30 आणि नकल वितरणाची वेळ दुपारी 2 ते 5.30 अशी बंधने असल्याने कर्जतसह आसपासच्या तालुक्यातून येणाऱ्या नागरिकांना दिवसभर थांबावे लागते किंवा पुन्हा फेरी मारावी लागते. त्यामुळे नकल अर्ज स्वीकारण्यापासून ते वितरणापर्यंतची वेळ दिवसभराची असावी, अशी ठाम मागणी अमोघ कुळकर्णी यांनी केली आहे.
भूमिअभिलेख कार्यालयात नकलसाठी सध्या अर्ज स्वीकारण्याची वेळ मर्यादित, साधारण 2-3 तास, नकल वितरणाची वेळ वेगळी, दुपारनंतरची मर्यादित वेळ वेगळी याचा परिणाम असा होतो की, कर्जत, नेरळ, खालापूर, मुंबई आणि पुणे यासारख्या दूरच्या गावातून सकाळी 9 वाजता निघालेला शेतकरी अर्ज देऊन दुपारी 3 वाजेपर्यंत कार्यालयाबाहेर उन्हा तान्हात, उपाशी तिष्ठत बसतो. किंवा अर्ज देऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा यावे लागते. काही शेतकरी शेती सोडून येतो. बसचा खर्च, दिवस वाया. वेळ ठरवून दिल्याने अर्धा दिवस फक्त नकलसाठी जातो. जर अर्ज आणि वितरण दिवसभर सुरू असेल तर आम्ही आलो की काम करून घरी जाऊ शकू,अशी मागणी आरटीआय अध्यक्ष अमोघ कुळकर्णी यांनी व्यक्त केली.







