| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात दहा हजार हेक्टर जमिनीवर खरीप हंगामात भाताची शेती केली जाते. साधारण जून महिन्याचे पहिल्या आठवड्यात भाताचे वाण यांची पेरणी केली जाते. मात्र, यावर्षी दुसरा आठवडा उलटला तरी भाताची पेरणी झालेली नाही आणि त्यामुळं कर्जत तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.
महाराष्ट्रात साधारणपणे 7 जूनच्या सुमारास मान्सूनचे आगमन होते. संपूर्ण वर्षभराची शेती आणि पाण्याचे नियोजन या जूनमधील पावसावर अवलंबून असते. जूनमध्ये पाऊस आला नाही आणि मान्सूनचे लांबलेले आगमन यामुळे शेतकरी चिंतेत आहे. गतवर्षी मे महिना पाऊस पडत होता आणि नंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे भाताचे वाण एकतर शेतात कुजले आणि अनेक शेतकऱ्यांना दुबार किंवा तिसऱ्यांदा भाताचे वाण शेतात टाकावे लागले होते. मान्सून अद्याप केरळमध्ये वेळेवर पोहोचला नाही, तर त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील आगमनावर झाला आहे. अरबी समुद्रातील हवामानाचे बदल किंवा हिंदी महासागरातील प्रवाहांची गती मंदावल्यामुळे मान्सूनचे आगमन 5 ते 10 दिवस उशिरा होते. परिणामी, जूनचे पहिले दोन आठवडे कोरडे गेले आहेत.
एल निनो हा घटक मान्सून रोखण्यास प्रमुख कारणीभूत ठरला असून, हवामानशास्त्रामध्ये तो पावसाचा आगमनाला रोखणारा सर्वात मोठा घटक समजला जात आहे. महासागरातील पाण्याचे तापमान जेव्हा सरासरीपेक्षा जास्त वाढते, त्याला एल निनो म्हणतात. याचा परिणाम म्हणून भारतातील मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि जून महिन्यात पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटते. अरबी समुद्रातील चक्रीवादळ यांनी मान्सूनची दिशा बदलली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे असून जून महिन्यात संततधार पाऊस पडायचा, आता मात्र पावसाचे दिवस कमी झाले आहेत. तापमान वाढल्यामुळे ढग तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत.
जूनचे मध्यापर्यंत पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे खरिपाची पेरणी करता आलेली नाही. अनेकांची धुळपेरणी देखील फुकट गेलेली आजे. उन्हाळ्यामुळे आधीच आटलेले पाण्याचे साठे जूनमध्ये पाऊस अद्याप पडला नाही. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जून महिन्यातील निघालेली पावसाची तूट ही प्रामुख्याने एल निनो, चक्रीवादळे आणि जागतिक तापमानवाढ यांसारख्या भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचा परिणाम आहे. निसर्गाचा हा लहरीपणा लक्षात घेता, शेतकऱ्यांनी हवामान खात्याचा अंदाज घेऊनच पेरणीचा निर्णय घ्यावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.







