| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा पोलिसांनी हेल्मेट न वापरता वाहन चालवणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये सुमारे 1 लाख 70 हजार रकमेची दंड वसुली करण्यात आली आहे. दरम्यान कारवाई ही मोटरसायकल चालकांच्या सुरक्षिततेसाठी असून, सर्वांनी हेल्मेट वापरावे असे आव्हान पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात हेल्मेट न वापरल्याने 75 मोटर सायकल चालकांच्या मृत्यू झाल्याची घटना घडल्या आहेत. ही बाब अतिशय गंभीर आहे. नागरिकांना व तरुण वर्गाला स्वतःच्या जीवाची काळजी राहिलेली नाही हेच यावरून दिसून येते. रायगड जिल्हा अधीक्षक आचल दलाल यांच्या आदेशानुसार रोह्यामध्ये पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये 1 हजार रुपये दंडाची रक्कम आहे. ज्या रस्त्यावर काही ठिकाणी अपघात घडतात अशा ठिकाणांना पोलिसांनी स्वतः भेट देत त्या ठिकाणी काही उपाययोजना म्हणून गतिरोधक लावता येतील का याची पाहणी केली. रोह्यात सर्वच ठिकाणी स्पीड ब्रेकर लावणे शक्य नाही. त्यामुळे वाहन चालकांनी ओव्हरटेक करू नये. ओव्हरटेक केल्याने फार वेळ वाचतो असे नाही त्यामुळे आपण वाहन सावकाश चालवली पाहिजे.
आपल्या घरी आपले कुटुंब वाट पाहत आहे, याचे भान गाडी चालवताना प्रत्येकाने राखले पाहिजे. 1 हजार रुपये दंड भरण्यापेक्षा सहाशे रुपयाचा हेल्मेट घेतला तर आपला जीव नक्कीच वाचेल. पुण्यावरून हेल्मेट घालून आलेल्या इसमाने मेढा रस्त्यावर आल्यावर हेल्मेट काढला व पुढे सदर व्यक्तीचा अपघात झाला जर हेल्मेट असता तर तो वाचला असता अशी झालेली घटनाही याठिकाणी रोह्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील पत्रकारांना सांगितली.
अपघाताच्या वेळी डोक्याला गंभीर दुखापत होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागतो, हे भीषण वास्तव समोर ठेवून पोलिसांनी ही मोहीम तीव्र केली आहे. केवळ दंड वसूल करणे हा या कारवाईचा उद्देश नसून, वाहनचालकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा मुख्य हेतू आहे. पोलिसांनी सर्व दुचाकीस्वारांना घराबाहेर पडताना अनिवार्यपणे आयएसआय मार्क असलेले दर्जेदार हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे.







