| उरण | प्रतिनिधी |
खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्यामामा) यांच्या पाठपुराव्यामुळे सिंगापूर पोर्ट मधून काही वर्षांपूर्वी कामावरून कमी करण्यात आलेल्या भूमिपुत्र सुरक्षा रक्षकांना पुन्हा रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड सुरक्षा मंडळामार्फत या सुरक्षा रक्षकांना जेएनपीए परिसरात पोस्टिंग देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या विविध आदेशांनुसार ट्रॅफिक वॉर्डन आणि सुरक्षा रक्षकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत कार्यवाही करण्याची मागणी सातत्याने होत होती. उरण सामाजिक संस्थेने नवी मुंबई वाहतूक विभागाकडे यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यानंतर खासदार सुरेश म्हात्रे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाठपुरावा केला.
रायगड सुरक्षा मंडळाने सिंगापूर पोर्टमधील नोंदणीकृत सुरक्षा रक्षकांपैकी काही जणांची निवड प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये लखपती परशुराम भोईर आणि ज्ञानेश्वर गजानन पाटील (कुंडेगाव, उरण) यांची निवड करण्यात आली असून त्यांना जेएनपीएमध्ये रुजू करून घेण्यात आले आहे. याशिवाय उर्वरित पात्र भूमिपुत्र सुरक्षा रक्षकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार असल्याचे संबंधितांनी स्पष्ट केले आहे.







