रसिका राकेश खराडे यांनी पटकावली मानाची साडी
| रसायनी | प्रतिनिधी |
मोहोपाडा येथील श्री गणेश युवक मित्र मंडळाच्या साखरचौथ गणरायाच्या साक्षीने विविध कला व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी मंडळाकडून करण्यात येणाऱ्या आकर्षक सजावटीसह विविध उपक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शनिवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता महिलांसाठी संगीत खुर्ची, सॉस गेम, तळ्यात-मळ्यात, गायन तसेच विविध मनोरंजक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात मोहोपाडा गावातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संगीत खुर्ची स्पर्धेत रंजना माळी यांनी प्रथम, तर आर्या धुरव यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तळ्यात-मळ्यात स्पर्धेत रसिका राकेश खराडे यांनी प्रथम, तर मोनाली तांडेल यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. सॉस गेममध्ये साक्षी खराडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे विजेत्या रसिका राकेश खराडे यांनी मानाची साडी जिंकली. मोहोपाडा येथील बी. बी. बांठिया यांच्यावतीने विजेत्या महिलांना पैठणी साडी तसेच चांदीची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर बी. बी. बांठिया यांच्या वतीने किशोरी गलबले, सुप्रिया पाटील आणि पुषा कटीमिन यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रिया गायकर यांनी केले.






