रातवड विद्यालयात दीपोत्सवाचा उत्साह; सांस्कृतिक कार्यक्रमांनी उजळला परिसर
| माणगाव | प्रतिनिधी |
रातवड येथील छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित माध्यमिक विद्यामंदिरात बुधवारी (दि.4) सायंकाळी दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचा परिसर विद्युत रोषणाई, आकर्षक किल्ले प्रदर्शन, दिवाळी गीतांचे सूर, विद्यार्थ्यांची नृत्ये, फटाक्यांची आतषबाजी आणि दिवाळी फराळाची मेजवानी अशा विविध उपक्रमांनी प्रकाशमय झाला होता.
सेवा इंटरनॅशनलचे सल्लागार प्रसाद शिरशिकर, किशोरी विकास प्रकल्पाच्या माणगाव विभाग प्रमुख निशा भादावकर, सामाजिक कार्यकर्त्या देवका मोरे, अमोल जाधव आणि मुख्याध्यापक संतोष कदम यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बहारदार दिवाळी गीतांनी आणि नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साकारलेली आकर्षक किल्ल्यांची प्रतिकृती हे दीपोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. तसेच, सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेले उटणे आणि पणत्या यांच्या निर्मितीमध्ये विशेष कौशल्य दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला, कल्पकतेला आणि व्यावहारिक कौशल्यांना प्रोत्साहन मिळाले.
उडान टीमच्या विशेष सहकार्यातून विद्यार्थी व पालकांना दिवाळीचा फराळ वितरित करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सागर भगत यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रदूषणमुक्त फटाक्यांची व्यवस्था करून दीपोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. फटाक्यांची आतषबाजी आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे उत्सवाला विशेष रंगत आली. विद्यालयात प्रथमच सायंकाळच्या सत्रात आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवाला पालक, आजी-माजी विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला. त्यामुळे शालेय परिसरात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी, सरचिटणीस डॉ. निलेश रेवगडे आणि शालेय समिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी मार्गदर्शन करून विशेष कौतुक केले. सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने आणि मुख्याध्यापक संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीतून हा दीपोत्सव संस्मरणीय ठरला. शिक्षणासोबत संस्कार, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालणारा हा दीपोत्सव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव ठरला.
