अन्न, औषध प्रशासनाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष; स्थानिकांमधून संतापाची लाट
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहरासह तालुक्यात अन्न सुरक्षा नियमांची पायमल्ली करून खाद्यपदार्थ विक्रीचा बाजार बिनधास्त सुरू आहे. कुणाकडे परवाना नाही, कुणाला स्वच्छतेचे सोयरसुतक नाही, तर कुणाचे खाद्यपदार्थांचे किचन थेट नाल्यांच्या आणि ड्रेनेज टाक्यांच्या आसपास असल्याच्या तक्रारी आहेत. तरीही अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष जात नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाची कृपादृष्टी उरणवर कधी होणार, असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित होत आहे.
उरणमध्ये हॉटेल, मिठाई दुकाने, चायनीज सेंटर, बेकरी, दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, बिर्याणी सेंटर, वडापाव, भजीपाव, मिसळ, ढाबे, फळविक्रेते, पाणी विक्रेते, पाणीपुरी, भेळपुरी अशा विविध खाद्यव्यवसायांचा सुळसुळाट झाला आहे. यातील अनेक व्यावसायिक आवश्यक परवानग्या आणि नोंदणीशिवाय व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी आहेत. भर रस्त्यावर खाद्यपदार्थ मांडायचे, उघड्यावर पदार्थ ठेवायचे आणि नागरिकांच्या ताटात काय वाढले जात आहे याची कोणतीही खातरजमा न करता व्यवसाय सुरू ठेवायचा, असा प्रकार सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवस उरणमधील विक्रेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यांच्याकडून दरपत्रके लावली गेली, कामगारांच्या डोक्यावर टोप्या चढवल्या, स्वच्छतेचे नियम पाळण्याची लगबग सुरू केली. मात्र, हा उत्साह काही दिवसांचाच ठरला. त्यानंतर पुन्हा उघड्यावरचे खाद्यपदार्थ, अस्वच्छ परिसर आणि नियमांना केराची टोपली दाखविण्यात आली. तसेच, अधिकृत परवानग्या असलेल्या काही व्यावसायिकांच्या जागांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी दलदलीच्या परिसरात खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचे दिसते, तर काही हॉटेल आणि बारच्या किचनबाबत ड्रेनेज टाक्यांच्या जवळ स्वयंपाकघर असल्याच्या तक्रारी आहेत. अशा ठिकाणी तयार होणारे पदार्थ नागरिकांच्या पोटात जात असतील, तर आरोग्याच्या सुरक्षेची हमी कोण देणार, असा प्रश्न स्थानिकांमधून उपस्थित केला जात आहे. या सर्व प्रकारांबाबत वारंवार आवाज उठविण्यात आला. लेखी तक्रारीही करण्यात आल्या. परंतु, अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही कारवाईचा बडगाही उगारला गेला नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
कागदी आश्वासने नकोत
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उरण तालुक्यात विशेष तपासणी पथक पाठवून हॉटेल, बार, मिठाई दुकाने, बेकरी, खाद्यपदार्थ विक्रेते आणि पाणी विक्रेत्यांची झाडाझडती घ्यावी. परवान्यांची तपासणी करावी, किचनमधील स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, अन्न साठवणूक आणि कामगारांच्या आरोग्यविषयक नियमांची पडताळणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून आवश्यकतेनुसार परवाने निलंबित करावेत. त्यामुळे आता कागदी आश्वासने नकोत, प्रत्यक्ष धडक कारवाई हवी, अशी मागणी उरणकरांमधून बोलले जात आहे.






