तळोजा कारागृहात 5 ग्रॅम गांजा जप्त; आरोपीविरोधात गुन्हा
| पनवेल | प्रतिनिधी |
जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने तळोजा मध्यवर्ती कारागृहात प्रवेश करताना पार्श्वभागात गांजा लपवून नेण्याचा प्रयत्न केल्याचे अंगझडतीत उघड झाले. कारागृह हवालदारांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
सेहेद मोहम्मद सुधु शाह ऊर्फ सज्जु (26, रा. दक्षिण दिल्ली, सध्या नेरळ, कर्जत) असे आरोपीचे नाव आहे. 5 ऑक्टोबर रोजी त्याला न्यायालयीन कोठडीनंतर तळोजा कारागृहात आणण्यात आले होते. प्रवेशापूर्वी अंगझडती घेत असताना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने कसून तपासणी करण्यात आली. त्यावेळी पार्श्वभागात लपवलेला सुमारे 5 ग्रॅम गांजा आणि तो लपवण्यासाठी वापरलेले काळ्या रंगाच्या सेलो टेपचे तुकडे आढळले. याप्रकरणी कारागृह प्रशासनाने खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.






