रस्त्यावरील खड्ड्याने घेतला बळी

संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

| नेरळ | वृत्तसंस्था |

मुरबाड-कर्जत या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक कामे अर्धवट आहेत. तर निकृष्ट दर्जाची कामे केल्याने रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. याच मार्गावरील खड्डा चुकवत असताना एका दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. महमद हरून असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

या महामार्गावरील पडलेले खड्डेे बुजवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. परंतु, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाचे अधिकाऱ्यांकडून रस्त्यावरील अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी महामार्ग अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. पेज नदीवरील पुलावरील खड्डे भरण्यात यावे यासाठी अनेकवेळा आंदोलने आणि निवेदने देण्यात आली. मात्र, त्याच खड्ड्याने दुचाकी चालकाचा बळी घेतला आहे.

कर्जत येथे अनेक वर्ष रोडरोलर भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे महमद हरून (45) यांचा रविवार दि.10 रोजी अपघात झाला होता. आपल्या रोडरोलर चालकाला घेऊन कशेळे येथून कर्जत येथे जात असताना पेज नदी पुलाच्या पुढे असणाऱ्या खड्ड्यात मोटरसायकल आपटून अपघात झाला होता. त्यामध्ये हरून यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. तेंव्हापासून ते पनवेल येथील गांधी रुग्णालयात उपचार घेत होते. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. 15 दिवसानंतर देखील तेे शुध्दीवर आले नाहीत. त्यांची प्रकृती खालावली आणि गुरुवारी दि.28 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील खड्डे कायम असल्याने त्या खड्ड्यांनी हरून यांचा बळी घेतला आहे. सदर अपघाता संदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हरून यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Exit mobile version