आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप पुन्हा भरारी घेईल

माजी आ. पंडित पाटील यांचा विश्‍वास; माणगावमध्ये कार्यकर्ता मेळावा
। माणगाव । प्रतिनिधी ।
कोणताही पक्ष हा कधीही संपत नसतो. शेकापला मानणारे आजही हजारो कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ असून येणार्‍या काळात शेकाप रायगड जिल्ह्यात आ. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भरारी घेईल, असे प्रतिपादन माजी आमदार पंडित पाटील यांनी माणगाव येथे पक्षाच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले.

2 ऑगस्ट रोजी शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन असून हा वर्धापन दिन यावर्षी वडखळला साजरा होणार आहे. वर्धापन दिनाच्या पूर्वनियोजनाची बैठक शनिवारी (दि.16) दुपारी 2 वाजता माणगाव येथील कुणबी भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार पंडित पाटील व पक्षाचे जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाबाबत मार्गदर्शन व सूचना केल्या.

या बैठकीला जे.बी. सावंत एजुकेशन सोसायटीचे चेअरमन नानासाहेब सावंत, तालुका चिटणीस रमेश मोरे, आरडीसीसी बँकेचे व्हा. चेअरमन सुरेश खैरे, राजिपचे माजी समाजकल्याण सभापती अशोक गायकवाड, आरडीसीसी बँकेचे संचालक अस्लम राऊत, पक्षाचे कार्यालयीन चिटणीस प्रदीप नाईक, कृउबा समिती माणगाव सभापती संजय पंदेरे, माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती निलेश थोरे, तालुका सहचिटणीस राजेश कासारे, नामदेव शिंदे, भागोजीबुवा डवले, हसनमिया बंदरकर, निजाम फोपळूणकर, देगावचे माजी सरपंच दिनेश गुगळे, युवानेते स्वप्नील दसवते, तळा तालुका शेकाप चिटणीस धनराज गायकवाड, अ‍ॅड.नितीन आंब्रे, अ‍ॅड. मुसद्दीक राऊत आदी मान्यवरांसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पंडित पाटील पुढे म्हणाले, शेकाप हा रायगड जिल्ह्यातील प्रमुख पक्ष आहे. जिल्ह्यातील खासदार हा शेकापच ठरवितो. शेकापने ज्याला साथ दिली तोच खासदार म्हणून आतापर्यंत निवडून आला आहे. प्रभाकर पाटीलांचा शेकाप पक्ष असून या पक्षात शिवबंधन बांधत नाही. शेकापचे जिल्ह्यात आजही हजारो कार्यकर्ते आहेत. पक्षातून एखाद दुसरा कार्यकर्ता गेला असेल परंतु पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इतर पक्षांप्रमाणे शेकाप कधी कोसळलेला नाही.

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात शेकापची 35 ते 40 हजार मते आहेत. शेकाप हा विचाराने चालणार पक्ष असून राज्यात घडलेल्या घडामोडी पाहता येणार्‍या काळात शेकापला चांगली संधी निर्माण झाली आहे, असा दावाही त्यांनी केला. शेकापच्या वडखळ येथे 2 ऑगस्ट रोजी होणार्‍या वर्धापन दिन कार्यक्रमास जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. मागील निवडणुकीत मला पाडण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीसह इतर अनेक पक्षांना एकत्र यावे लागले. तरी मला अलिबाग मतदार संघातून 80 हजार मते पडली. लोकांचा आजही शेकाप पक्षावर तेवढाच विश्‍वास आहे, असे ते म्हणाले.

घरी झळकवा पक्षाचा झेंडा
यावेळी वर्धापन दिनाबाबत कार्यकर्त्यांना सूचना करताना जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील म्हणाले कि, 2 तारखेला होणार्‍या पक्षाच्या वर्धापन दिनाबाबत प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरी पक्षाचा झेंडा लावावा. तसेच शुभेच्छापर बॅनर रस्त्याच्या कडेला व्यवस्थित लावावे, अशा विविध सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना करून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी वर्धापन दिनाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

देशातील मुंबई-गोवा महामार्ग हा महत्वाचा मार्ग असून या मार्गाच्या पळस्पे ते इंदापूर पर्यंतच्या रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. रायगड जिल्ह्यातील महत्वाच्या अनेक मार्गांवरील रस्त्यांची अवस्था फार बिकट झाली आहे. वडखळवरून अलिबागला जाण्यासाठी दोन तास लागत आहेत .जिल्ह्यातील या रस्त्यांकडे केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

– पंडित पाटील,माजी आमदार

2 ऑगस्टला दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. यावर्षी हा वर्धापन दिन वडखळ याठिकाणी आयोजित केला आहे. या वर्धापन दिनासाठी माणगावातून हजारोंच्या संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहू. माणगाव तालुक्यात पूर्वी जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीचे आठ गण होते. आता जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गण झाले असून तालुक्यात शेकाप मार्फत मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असल्याने या निवडणुकीत शेकापला चांगले यश मिळेल.

रमेश मोरे, शेेकाप, तालुका चिटणीस, माणगाव

Exit mobile version