आश्वासनांचा हिशोब मागणाऱ्या ग्रामस्थांचा सवाल
| खोपोली | प्रतिनिधी |
एकीकडे विकासाच्या दाव्यांचा गजर आणि दुसरीकडे स्वातंत्र्याच्या आठ दशकांनंतरही गर्भवती महिलेला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ…खालापूर तालुक्यातील उंबरणेवाडीतील हे वास्तव समाज माध्यमांवरील व्हिडिओमुळे समोर आले आहे. या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या तरुणांच्या रिल्सवर आम्हाला त्या रिल्सचा काही फरक पडत नाही, परिणाम होत नाही, असे उरणचे आमदार महेश बालदी यांनी कथितरीत्या म्हटल्याने आदिवासी ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
उंबरणेवाडी, आरकसवाडी आणि पीरकडवाडी या दुर्गम वाड्यांतील नागरिकांसाठी आजही रस्ता हीच सर्वात मोठी समस्या आहे. पावसाळ्यात डोंगर-दऱ्यांमधून वाट काढत रुग्णांना मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागते. गर्भवती महिलेलाही झोळीतून दवाखान्यात नेण्याची वेळ येत असेल, तर विकासाच्या दाव्यांचे मोजमाप नेमके कुठे करायचे, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
दोन वर्षांपूर्वी आ. बालदी नवरात्रोत्सवासाठी वाडीत आले होते. देवीसमोर शपथ घेऊन रस्ता आणि वीज देण्याचे आश्वासन दिले होते. त्या शपथेचे काय झाले? असा थेट सवाल ग्रामस्थांनी केला आहे. इरशाळवाडी दुर्घटनेनंतर या परिसरातील वाड्यांना रस्त्याची सुविधा मिळेल, अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे आश्वासनांच्या घोषणा झाल्या; मात्र रस्त्यासाठी दगडही पडला नाही, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या तरुणांवर प्रतिक्रिया देण्याऐवजी वाडीतील मूलभूत प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. आम्ही ज्या परिस्थितीत दिवस काढत आहोत, ते दिवस तुम्ही काढू शकत नाही, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आमदारांना सुनावले. आम्ही एवढे व्हिडिओ बनवले, ते आमदारांपर्यंत पोहोचले असतील. मात्र, एकदाही प्रतिसाद मिळाला नाही. इतर आमदार तातडीने प्रतिक्रिया देतात, अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली. आमदार फक्त निवडणुकीपुरते येतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. इरशाळवाडीला वीज देण्याच्या दाव्यावरही ग्रामस्थांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, तेथे फाउंडेशनच्या माध्यमातून वीज उपलब्ध झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
एकीकडे आधुनिक महामार्ग, मोठे प्रकल्प आणि विकासकामांचे दावे केले जात असताना दुसरीकडे त्याच मतदारसंघातील आदिवासी वाडीत गर्भवती महिलेला झोळीतून दवाखान्यात न्यावे लागत आहे. त्यामुळे उंबरणेवाडीचा व्हिडिओ हा केवळ एक ‘रिल्स’ नसून, विकासाच्या दाव्यांसमोर उभा राहिलेला आरसा आहे, अशी संतप्त भावना ग्रामस्थांमध्ये आहे. आमदार बालदी यांच्या कथित रिल्सचा परिणाम होत नाही या वक्तव्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी तो अधिक तीव्र झाला असून, आता ग्रामस्थांना आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष रस्ता आणि वीज कधी मिळणार, याचे उत्तर अपेक्षित आहे.
