महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील प्रगल्भ व्यक्तिमत्त्व म्हणून शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्याकडे पाहिले जाते. गेले तीन तपाहून अधिक काळ ते सर्वच क्षेत्रात धडाडीने काम करताना दिसत आहेत. एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणूनही त्यांची ख्याती आहे. जे काम हाती घेतले, ते तडीस लावण्याचा त्यांचा खाक्या आहे. कधीकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात शेकापचे वर्चस्व होते. कालौघात ते कमी कमी होत गेले; पण जे काही अस्तित्व आहे, ते टिकवून ठेवण्याचे काम जयंत पाटील यांनी प्रामाणिकपणे करताना दिसतात, त्यामुळेच राज्यातील युवा पिढी त्यांच्याकडे मोठ्या आशेने बघताना दिसत आहे.
रायगड जिल्हा हा शेकापचा बालेकिल्ला. या बालेकिल्ल्याचे अस्तित्व टिकविण्याबरोबरच शेकापचे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या ठिकाणीही शेकापची नवी पिढी घडविण्याचे काम जयंत पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह करताना दिसत आहेत. आव्हान मोठे आहे. कारण, राज्यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व वाढलेले आहे. अशा स्थितीतही राज्यातील डावी चळवळ शेकापच्या माध्यमातून टिकविण्याचे आव्हान जयंत पाटील यांनी पेलून दाखविलेले आहे. त्यामुळे राज्यस्तरावरील पक्षांना शेकापच्या भूमिकेची नेहमीच दखल घ्यावी लागते. मग तो मुद्दा विधिमंडळातील असो वा रस्त्यावरील आंदोलनाचा. फडणवीस सरकार सत्तेवर असताना राज्यातील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यावेळी सरकार आणि आंदोलनकर्ते यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचे काम जयंत पाटील यांनी केले होते. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास फडणवीस सरकारला भाग पाडले होते. अर्थात, सरकारने त्या मागण्या मान्य करुन नंतर त्याची पूर्तता नाही केली हे जरी वास्तव असले, तरी एखादे आंदोलन चिघळत असताना त्यामध्ये चर्चा घडवून आणून सरकारला मागण्या मान्य करायला लावणे, हे महत्त्वपूर्ण काम जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे राज्यकर्त्यांना किंवा आंदोलनकर्त्यांना जयंत पाटील यांच्यासारखे संवाद घडवून आणणारे धुरंधर राजकारणी सोबत हवे असतात. शेवटी लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण, ते आंदोलन कितपत ताणावे, हेसुद्धा ठरविले गेले पाहिजे, नाहीतर त्या आंदोलनाकडे सारेजण दुर्लक्ष करतात.
विधिमंडळात एक अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून जयंत पाटील यांची ख्याती आहे. तीन टर्म ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत. या काळात रायगडसह राज्यातील जनतेच्या अनेक मूलभूत समस्यांना वाचा फोडण्याचे काम जयंत पाटील यांनी केले आहे. सभागृहात मुद्दा मांडताना त्याचा नीट अभ्यास करुन आक्रमकपणे तो सादर करण्यावर त्यांचा भर राहिलेला आहे. आतापर्यंत विधिमंडळात शेकापच्या अनेक धुरंधर नेतेमंडळींनी आपल्या अभ्यासूपणाची झलक दाखविलेली आहे. केशवराव धोंडगे, त्र्यं.सि. कारखानिस, एन.डी. पाटील, गणपतराव देशमुख, दत्ता पाटील, विठ्ठलराव हंडे, मोहन पाटील, विवेक पाटील, मीनाक्षी पाटील, पंडित पाटील, धैर्यशील पाटील आदींनी आपल्या अभ्यासूपणाची झलक विधिमंडळात दाखवून जनहिताच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. तीच परंपरा जयंत पाटील हे निष्ठेने चालविताना दिसत आहेत. शेकाप नेत्यांना अमोघ असे वक्तृत्व लाभलेले आहे. त्या जोरावर विधिमंडळातील कायद्यांचा आधार घेत ते मुद्दे मांडून प्रसंगी सरकारला कायद्यात बदल करण्यास शेकापने भाग पाडलेले आहे. नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात आ. जयंत पाटील यांनी पेण तालुक्यातील डोलवी येथे होऊ घातलेल्या एमआयडीसी प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित करुन ज्या प्रकल्पांसाठी सरकारने जमिनी संपादित केलेल्या आहेत, त्या जमीन मालकांना 50 टक्के नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी केलेली आहे. त्याची दखल घेत सरकारने तसा कायदा केला आहे. याचा लाभ आता भविष्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना होणार आहे. हे सारे जयंत पाटील यांच्यामुळे झाले, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. यासारखे अनेक लोकोपयोगी मुद्दे जयंत पाटील यांनी गेल्या तीन टर्ममध्ये मांडून सरकारला कायदे करण्याबरोबरच अनेकदा केलेल्या कायद्यात बदल करण्यास भाग पाडलेले आहे.
आक्रमकपणा हे जयंत पाटील यांचे खास वैशिष्ट्य होय. त्यामुळे कोणत्याही शासकीय बैठकीत ते सहभागी असले की, बैठक ही गरमागरम होणार हे उघडच. अनेकदा बैठकीतच वादावादी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून काम करुन घेण्याची हातोटीही जयंत पाटील यांना चांगली अवगत आहे. अनेकदा चांगले काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यातही त्यांनी आपला हात कदापि आखडता घेतला नाही. कोरोनाची साथ असो वा निसर्ग चक्रीवादळ, महाडचा जलप्रलय अशा कठीण प्रसंगी प्रशासनाला योग्य ते सहकार्य करण्याची भूमिकाही जयंत पाटील यांनी नेहमीच स्वीकारली. त्यामुळे प्रशासनामध्येही जयंत पाटील यांच्याबाबतीत नेहमीच आदराचे स्थान राहिलेले आहे. काम होत असेल तर करणार, होणार नसेल तर तोंडावर नाही होणार असे ठामपणे सांगण्याची वृत्तीही त्यांनी जोपासली आहे.
परिस्थितीनुरुप अचूक निर्णय घेणे हीसुद्धा जयंत पाटील यांची खासियत होय. रायगडच्या राजकारणावर त्यांची चांगलीच पकड आहे. सन 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत शेकापचा अलिबाग, पेण, उरण, पनवेल पारंपरिक मतदारसंघात पराभव होऊनही शेकापला जिवंत ठेवण्याचे काम जयंत पाटील यांनी केलेले आहे. निवडणुकीत जय-पराजय होतच असतात. पण, जय मिळाल्यावर उन्मत्त न होता आणि पराभवात न खचता पुन्हा ताठ मानेने उभे राहण्याचे काम जयंत पाटील यांनी केलेेले आहे. सत्ता असो वा नसो आम्ही जनतेसाठी सदैव तयार आहोत, हीच भूमिका घेत जयंत पाटील हे राज्याच्या राजकारणात वावरत आहेत. आज ते सत्तरीच्या उंबरठ्यावर आलेले आहेत. तरीही युवकांना लाजवेल अशा तडफेने त्यांचा सर्वत्र संचार सुरु असतो. बदलत्या राजकीय परिस्थितीवरही अचूक भाष्य करण्याची कला त्यांना चांगली अवगत आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवरच रायगडचे राजकारण ठरत असते. रायगडसह महाराष्ट्राला जयंत पाटील यांच्यासारख्या धुरंधर, प्रगल्भ राजकीय नेत्याची नितांत गरज आहे. त्यांच्यासारखे जागरुक लोकप्रतिनिधी आहेत म्हणूनच आज जनसामान्यांना मोठा आधार वाटतोय, हे नक्की. भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
– अतुल गुळवणी