श्रीवर्धनमध्ये माकडांचा उच्छाद

| श्रीवर्धन | वार्ताहर |

सध्या रानामध्ये माकडांना खाण्यासाठी कोणत्याही प्रकारची फळं किंवा अन्य खाद्य उपलब्ध नसल्यामुळे माकडांनी व वानरांनी आपला मोर्चा बागायतदारांच्या बागायतीमध्ये वळवला आहे.

श्रीवर्धन व हरिहरेश्‍वर परिसरामध्ये नारळ, सुपारी व केळीच्या बागा आहेत. या बागांमध्ये दहा ते बारा माकडांचे कळप एकाच वेळी घुसत असून, खूप मोठ्या प्रमाणात ओरडाओरड करतात. तसेच नारळाच्या झाडावर चढून शहाळ्याचे पाणी पिऊन शहाळे खाली फेकून देतात. तर, केळीच्या झाडांवरती तयार झालेली केळी पूर्ण लोंगरच्या लोंगर फस्त करून टाकतात. अनेक वेळा या बागायतीमधून दुसर्‍या बागायतीत जाताना रस्ता ओलांडताना एका रांगेत माकडे जात असल्याने मोटारसायकलस्वारदेखील पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, वन विभागाकडून या माकडांचा व वानरांचा कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त करण्यात येत नाही. या माकडांना कोणी दगड किंवा काठी उगारल्यास समोरच्या व्यक्तीच्या अंगावरदेखील जातात. तरी, वन विभागाने या माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी बागायतदारांमधून केली जात आहे.

Exit mobile version