| पाताळगंगा | प्रतिनिधी |
ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव हद्दीतील चौक येथे असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या सभोवताली मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे आणि गवत वाढल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या परिसरात झाडाझुडपांची वाढ झपाट्याने झाली असून, पाण्याच्या टाकीभोवती अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने या परिसराची तातडीने स्वच्छता करून झाडे-झुडपे हटवावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. चौक परिसरात दिवसेंदिवस विविध समस्या वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. रस्त्यांवरील खड्डे, वाहतुकीची कोंडी यासह आता पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ वाढलेले गवत व झुडपे यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची साठवणूक करणाऱ्या टाकीच्या परिसरात स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
सतिष अंबावने
पिण्याचे पाणी ही नागरिकांच्या आरोग्याशी निगडित अत्यंत महत्त्वाची बाब आहे. टाकीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात गवत आणि झुडपे वाढल्याने परिसराकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतीने केवळ एकदाच नव्हे, तर नियमितपणे या परिसराची पाहणी करून स्वच्छता राखावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थ चौक
पाण्याच्या टाकीचा परिसर लवकरच व्यवस्थित स्वच्छ करण्यात येईल. नागरिकांच्या पाण्याची साठवणूक या टाकीत होत असल्याने या परिसराच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे सातत्याने लक्ष राहील. झाडे-झुडपे काढून परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
विश्वास वारे
ग्रामसेवक ग्रुप ग्राम पंचायत तुपगांव






