। रायगड । प्रतिनिधी ।
दिवाळीत घरोघरी आकाश कंदील लावले जातात. त्याचप्रमाणे दिवाळीच्या वेळी शहरांच्या चौकात, गल्लीत आपल्या राजकीय पक्षांचा प्रचारासाठीदेखील या कंदिलांचा वापर केला जातो. दिवाळीच्या काळात दोन ते तीन महिन्यांपासून कंदील बनवणार्या कारागिरांना मोठमोठ्या कंदिलांची ऑर्डर दिली जाते; मात्र सध्या निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय पक्षांच्या प्रचाराला काही मर्यादा आल्या आहेत.
त्यामुळे आपल्या नेत्याचा फोटो, दिवाळीच्या शुभेच्छा, पक्षांचे चिन्ह वगैरे वापरण्यास निवडणूक आयोगाकडून काही बंधने आली आहेत. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राजकीय कंदिलांच्या ऑर्डर न मिळाल्याने कंदील तयार करणारे कारागीर आणि व्यावसायिकांना ऐन दिवाळीच्या काळात आर्थिक तंगी अनुभवावी लागत आहे.
दिवाळीच्या काळात कंदील व्यवसायाला बहर येतो. हंगामी व्यवसाय करणार्या व्यावसायिक, कारागिरांसाठी दिवाळी सण हा कमाईचा मोठा स्रोत असतो. घरगुती कंदिलातून मिळणारा नफा कमी असतो. त्याउलट राजकीय किंवा मंडळांसाठी बनवलेल्या कंदिलांची किंमत जास्त आणि त्यातून मिळणारा नफादेखील जास्त असतो. त्यामुळे लहान कंदिलांसोबतच मोठ्या कंदिलांनादेखील व्यावसायिकांकडून विशेष प्राधान्य दिले जाते; मात्र आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून कंदिलांचा ऑर्डर येणे बंद झाल्याचे कंदील व्यावसायिक सांगत आहेत. त्यामुळे दरवर्षी होणार्या आर्थिक उलाढालीवर काहीसा चाप बसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. याचाच दुसरा परिणाम म्हणजे कारागिरांचे रोजगारदेखील यंदा कमी झाल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांची आणि सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी जरी धुमधडाक्यात साजरी होणार असली तरी कंदील व्यवसायावर मंदीचे सावट पसरलेले पाहायला मिळत आहे. वाढत्या महागाईचा परिणाम कंदील बनवण्यासाठी लागणार्या कच्च्या मालावरदेखील झाला आहे. त्यामुळे कंदिलांच्या किमती काहीशा वाढल्या आहेत; मात्र दिवाळीच्या सणात कंदील विकत घेण्यासाठीचा नागरिकांचा उत्साह कमी झालेला नाही.
दरवर्षी राजकीय पक्षांकडून साधारण मोठ्या कंदिलांची मागणी असते; मात्र यंदा आचारसंहितेमुळे राजकीय पक्षांकडून मोठ्या कंदिलांसाठी मागणी नाही. विधानसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेमुळे आकाश कंदिलांची निर्मिती कमी झाली असून व्यवसायावर आर्थिकदृष्ट्या परिणाम झाला आहे.
चंद्रकांत बामणे,
विक्रेते







