श्रीवर्धनमध्ये चोरांचे राज्य?

राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे येथील नागरिक सुरक्षित आहेत का? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे. यावेळी पक्षाचे उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी थेट उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना जळजळीत निवेदन सादर केले असून, पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

श्रीवर्धन शहरात एकामागून एक होणाऱ्या चोरीच्या सत्रांमुळे सामान्य जनतेत दहशतीचे वातावरण आहे. ‌‘पोलीस नक्की करतात काय’, असा सवाल विचारण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी गस्त केवळ नावापुरतीच उरली असून, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस प्रशासनाच्या सुस्त कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, श्रीवर्धनकर सध्या भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. घरातील मौल्यवान वस्तू सोडाच, पण जीवही सुरक्षित नसल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृती करून गुन्हेगारांना जेलची हवा दाखवावी, अन्यथा यापुढील उद्रेकास प्रशासन जबाबदार असेल. या निवेदनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सन्माननीय नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता पोलीस प्रशासन यावर नेमकी काय पावले उचलते, याकडे संपूर्ण श्रीवर्धनचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version