। खोपोली । प्रतिनिधी ।
कर्जत-खालापूरचे प्रतिनिधीत्व करणार्या लोकप्रतीनिधीने प्रस्तावित नारंगी एमआयडीसीतील साडेतीनशे एकर जमीन लाटल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते भूषण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत भूषण पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून शासनाचे सुमारे साडे चार कोटी रुपये न्यू मिलेनियम कंपनीने बुडवले असून संबंधित लोकप्रतींनिधीच्या नातेवाईकांच्या नावे जमीन घेतली गेल्याचा आरोप केला आहे.
औद्योगिक कारणासाठी जमीन घेतल्यानंतर नजराना म्हणून दिलेले साडे चार कोटी रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याचे भूषण पाटील यांनी म्हंटले असून या प्रकरणात लक्ष घालून तहसीलदारांनी योग्य ती कारवाई करत झालेली ऑर्डर रद्द करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.खानाव येथे भूषण पाटील यांनी पत्रकार परिषद घेत नंदनपाडा, गोठिवली, गोहे येथील मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित असून कर्जत -खालापूरातील लोकप्रतिनिधी न्यू मिलेनियम कंपनीला पाठीशी घालत असल्याचे सांगितले. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकार्यांकडून प्रथम सन -2019 ला ऑर्डर पारीत करीत मूळ मालकांना गायब करीत त्या सातबार्यावर न्यू मिलेनियम कंपनी यांचे नाव लावले. त्यानंतर एखादी ऑर्डर औद्योगीकरणासाठी घेता तेथे औद्योगीकरण न करता ते सातबारा जे लोकप्रतिनिधींचे नातेवाईक आहेत, त्यांच्या नावावर खरेदीखत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत सहा सात महिन्यापूर्वी माजी आमदार सुरेश लाड यांच्या कानावर हे प्रकरण घातले असून पालकमंत्री अदिती तटकरे, खा. सुनील तटकरे यांनाही माहिती दिल्याचे पाटील यांनी सांगितले. आघाडीचा धर्म म्हणून या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंतही भूषण पाटील यांनी व्यक्त केली. या प्रकरणात शेतकरी आपल्या सोबत आहेत. तहसीलदारांच्या नावे दिलेले साडे चार कोटी रुपयांचे चेक बाऊन्स झाल्याने तहसीलदारांनी जिल्हाधिकार्यांना पत्र देवून सदर ऑर्डर रद्द करावी, अशी मागणी भूषण पाटील यांनी केली आहे.
शेतकर्यांसोबत साधे साठेकरार करण्यात आले आहेत. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून या निर्णयावर आपण ठाम असल्याचे भूषण पाटलांनी म्हटले आहे.भूषण पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्याकडे असलेली कागदपत्र आणि अन्य माहिती माध्यमांना दिली आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. शासन स्तरावर या प्रकरणात पाठपुरावा केल्याचे सांगत हे प्रकरण मोठे असून आपल्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास संबंधित जबाबदार असतील असे भूषण पाटील यांनी संगितले.