| रोहा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील बाहे येथील मोलमजुरी करणारे शंकर अंबाजी देवकर यांच्या घरालगत असलेली संरक्षण भिंत जोराच्या पावसात कोसळली. पाणी वाहून जाणाऱ्या नाल्याच्या पाण्याचा मोठा गुरुळ लागल्याने ही भिंत कोसळल्याचे बोलले जात असून, सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र, भिंत कोसळल्याने देवकर यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शंकर देवकर यांचे घर टेकडीवर अधांतरी आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या घराची पडझड होण्याची भीती त्यांच्या मनात असल्याने त्यांनी स्वखर्चाने घराला संरक्षण मिळावे म्हणून मे महिन्यात संरक्षण भिंत बांधली. याकामी त्यांचे जवळपास 50 हजार रुपये खर्च झाले आहेत. दरम्यान, पावसाने जोरदार हजेरी लावल्याने त्यांच्या घरा शेजारील पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या नाल्याला अचानक गुरुल पडला. त्यामुळे त्याचे पाणी घरात आणि संरक्षण भिंतीच्या बांधकामात घुसल्याने ही भिंत पडली, असे त्यांनी सांगितले. तसेच, भिंत कोसळल्याची माहिती गावचे पोलीस पाटील मनोज थिटे आणि ग्रामस्थ यांनी अधिकारी वर्गाला दिली आहे. चिल्हे गावाचे तलाठी रोहित राजने यांनी या घटनेची माहिती घेत त्याचा पंचनामा करून नुकसानग्रस्त घर मालकाला मदत मिळेल, असा दिलासा दिला आहे.






