स्नेहमेळाव्याने 51 वर्षांची ‌‘अभिनव’ ची घट्ट मैत्री

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत मधील अभिनव ज्ञान मंदिर शालेच्या 1975 सालात जुन्या अकरावी इयत्तेत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्यानंतर वेळोवेळी माजी विद्यार्थी स्नेहमेळावे आयोजित केले. त्यांनी 51 वर्षे झाली तरी हे सातत्य टिकवून ठेवत स्नेहमेळावा आयोजित केला आणि विशेष म्हणजे त्यांचा एक वर्गमित्र तब्बल 51 वर्षांनी भेटला. त्यामुळे त्यांची मैत्री घट्ट होत चालली आहे.

येथील रॉयल कर्जत कॅम्पच्या सभागृहामध्ये 1975 सालच्या जुन्या अकरावीतील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. गेल्या वर्षी शाळा सोडून पन्नास वर्षे झाल्याने त्याच ठिकाणी सुवर्ण महोत्सवी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. त्या स्नेहमेळाव्याला त्यावेळी त्यांना शिकविणाऱ्या त्यांच्या आवडत्या शिक्षिका उषा जोशी उपस्थित होत्या. त्यावेळी तब्बल 62 वर्गमित्र आणि मैत्रिणी उपस्थित होत्या. या स्नेहमेळाव्यात अनेक जण पहिल्यांदाच उपस्थित राहिले होते. प्रत्येकाने एकच गणवेश केला होता. तसेच प्रत्येकाने शाळेत व शाळा सोडल्यावर आत्तापर्यंत काय कर्तृत्व केले याचा लेखाजोखा असलेले सन्मानपत्र वैद्य बाईंच्या हस्ते देण्यात आले. त्यावेळी खऱ्या अर्थाने एकमेकांची ओळख झाली होती.

यंदाच्या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन हेमंत डोंबे, प्रकाश ओसवाल, बाळू तवळे, विजय मांडे, प्रभाकर खैरनार, मदन परमार, दिगंबर कांबळे, संजय परदेशी आदिंच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर प्रत्येकाने गेले वर्ष कसे घालवले हे सांगितले. यावेळी 51 वर्षांनी भेटलेल्या पुण्याहून आलेल्या चंद्रशेखर उखंडे या वर्गमित्राचे स्वागत करून त्याची विचारपूस केली. त्यानेही त्याचा जीवन प्रवास सविस्तर पणे सांगून पुढील स्नेहमेळावे आणि सहलींना येण्याचा शब्द दिला. त्यानंतर सुख-दुःखाच्या गप्पा रंगल्या.

Exit mobile version