जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले सूक्ष्म नियोजनाचे निर्देश
| रायगड | खास प्रतिनिधी |
रायगड किल्ल्यावर तारखेनुसार 6 जून व तिथीनुसार 20 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. मागील वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे कार्यक्रमाला शिवप्रेमी नागरिकांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती होती. त्यामुळे नियोजन करताना सरकारी यंत्रणांवर प्रचंड ताण आला होता. त्यामुळे यंदा जिल्हा प्रशासन अधिक सर्तक झाले आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बैठक घेत संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश दिले.
रायगड किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा 2024 च्या अनुषंगाने नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शिवप्रेमी नागरिक रायगड येथे येत असतात. यावर्षी होणार्या कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून तयारी केली जात आहे. मागील वर्षी 15 हजार व्यक्तींची क्षमता असलेल्या गडावर अडीच लाखांपेक्षा जास्त शिवप्रेमी आल्यामुळे सुरक्षा व पायाभूत सुविधांवर मोठा ताण निर्माण झाला होता. हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी कोणतीही समस्या उद्भवू नये या दृष्टीने आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी पूर्वतयारी केली जावी, असे निर्देश जावळे यांनी दिले. येणार्या नागरिकांच्या वाहनांचे पार्किंग, पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता तसेच या कालावधीत आवश्यक असणार्या विविध सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी, असे त्यांनी सूचित केले.
महाड व माणगावमार्गे येणार्या खासगी वाहनांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रस्त्यांची कामे, पार्किंगच्या जागा व तेथून गडाकडे जाणार्या मार्गाची व्यवस्था संबंधित विभागांनी पूर्ण करावे. तसेच, आवश्यक ती माहिती देणारे फलक लावले जावेत, असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. तत्पूर्वी, जावळे आणि उपस्थित सर्व अधिकारी यांनी रायगड किल्ल्याची पाहणी केली. तसेच आवश्यक तयारीच्या अनुषंगाने त्यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बस्तेवाड, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एन.आर. नामदे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता दिलीप चौरे, पोलीस उपअधीक्षक एस.बी. काळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आंबादास देवमाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांच्यासह विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.