। माणगाव । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासन ‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत तब्बल 4 कोटी किंमतीचा भात प्रक्रिया प्रकल्प माणगावजवळील दाखणे येथे उभारण्यात येणार असून त्याचा फायदा येथील शेकडो शेतकर्यांना होणार आहे, अशी घोषणा माणगांव तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या वार्षिक सभेत अध्यक्ष विपुल उभारे यांनी केली.
माणगाव तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा दाखणे येथे आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त, माजी सरपंच दिलीप पांडुरंग उभारे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. प्रास्ताविकपर भाषण करताना विपुल उभारे यांनी कंपनीच्या कामकाजाची सविस्तर माहिती उपस्थित मान्यवर, सभासद, महिला, शेतकरी बांधवाना दिली. महाराष्ट्र शासनाच्या बाळासाहेब ठाकरे ग्रामिण कृषी परिवर्तन (स्मार्ट) या प्रकल्पाअंतर्गत माणगांव तालुका फार्मर प्रोड्युसर या आपल्या कंपनीला भात या पिकावरती प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उद्योग उभारण्याकरिता प्राथमिक मान्यता मिळाली असून लवकरच सविस्तर प्रकल्प अहवालालासुद्धा अंतिम मंजुरी मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या प्रस्तावित प्रकल्पाची अंदाजित किंमत 4.0 कोटी रुपये असून या प्रकल्पामुळे शेतकर्यांच्या आर्थिक उत्पन्नात, नफ्यात वाढ होणार असून आपल्या भागात रोजगार निर्मिती होऊन अर्थकारणालासुद्धा चालना मिळणार आहे.
खर्या अर्थाने शेती आणि माती आपल्याला जगवते, म्हणूनच शेतीपासून कधीही दूर न जाता घाम गाळून आपल्या या काळ्या आईची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष दिलीप पांडुरंग उभारे यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्याकडे 1976 सालामध्ये कृषी मेळाव्यातील बाजारामधून केवळ 10 रुपयांमध्ये विकत घेतलेल्या म्हशीच्या बीज-वंश परंपरेतून जन्मास येत असलेल्या म्हशी आजही आपल्या गोट्यात असल्याचे उदाहरण देत पशुधन आणि दुग्धव्यवसायाचे महत्व सांगितले.