राजकीय चर्चांना उधाण; ठाकरे गटाकडून मतदारसंघावर दावेदारी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे (अजित पवार गट) जिल्हा नेते सुधाकर घारे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे कर्जत विधानसभा मतदारसंघामधून मशाल चिन्ह असलेला उमेदवार लढणार असल्याबद्दल आश्वासक असल्याचे दिसून येत आहेत.
पितृ पक्ष संपल्यानंतर आणि घट बसल्यानंतर कर्जत विधानसभा मतदारसंघात प्रचंड राजकीय घडामोडी पडद्यामागून घडू लागल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ‘काटे की टक्कर’ की ‘पक्षांतरे’ यावर जोरदार राजकीय उलथापालथ घडताना दिसत आहेत. 189 कर्जत विधानसभा मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. त्यांचा पक्ष महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असून, महायुतीमध्ये भाजप आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील आहे. परंतु, महायुतीमध्ये तिन्ही पक्ष या विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी करीत आहेत.त्यामुळे तीनपैकी एकाच उमेदवाराला उमेदवारी मिळणार असल्याने सुधाकर घारे यांची राजकीय गोची होऊ शकते. परंतु, कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्यासाठी मागील अडीच वर्षे तयारी करीत असलेले सुधाकर घारे तुतारी हाती घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत हेदेखील इच्छुक असून, मागील अडीच वर्षांपासून तेही कामाला लागले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांना सोबत घेऊन लोकसभा निवडणुकीत खासदार श्रीरंग बारणे यांना तब्बल 17650 मतांनी मागे ठेवले होते. त्यामुळे नितीन सावंत यांची उमेदवारी प्रबळ मानली जात आहे.
मात्र, कर्जत विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार यांना पराभूत करणे हा एकमेव उद्देश शिवसेना ठाकरे पक्षाचा आहे. हाच उद्देश महायुतीमधील सुधाकर घारे यांचादेखील आहे. त्यात सुधाकर घारे हे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या गाठीभेटी घेत असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांच्याकडून कर्जत मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार मिळाल्यास कर्जत मतदारसंघ शिवसेना ठाकरे पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाकडे खेचून घेतला जाऊ शकतो. त्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून सुधाकर घारे यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रबळ दावेदार असलेले नितीन सावंत यांची भेट घेऊन कर्जत मतदारसंघातील राजकीय गणितांची चर्चा झाल्याची चर्चा आहे. या दोघांनी एका त्रयस्थ ठिकाणी ही चर्चा केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी घारे आणि सावंत यांची भेट झाली असल्याचे पसरवले जात असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. कर्जतमधून उध्दव ठाकरे पक्षाचा शिवसैनिक बंडखोर आमदाराला पाडणार आणि कर्जतवर पुन्हा भगवा फडकावला जाणार, असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.
मात्र, सुधाकर घारे यांच्याकडून दररोज वेगवेगळ्या स्तरावर महाविकास आघाडीचे दार ठोठावले जात आहे, अशी चर्चा सुरू आहे. पण, सुधाकर घारे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आणि कर्जत मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटला नाही तर अनेक अडचणी घारे यांच्यासाठी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आयत्यावेळी मशाल हाती घेण्याची वेळदेखील येऊ शकते. त्यावेळी विद्यमान आमदारांचा पराभव आणि निवडून येण्याची क्षमता हाच एकमेव निकष महाविकास आघाडी वापरणार आहे. त्यामुळे नितीन सावंत यांच्या काहीशी पक्क्या समजल्या जाणार्या उमेदवारीबद्दल संशय व्यक्त होऊ लागला आहे. मात्र, घारे यांनी खरोखर शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत काय? घारे आणि नितीन सावंत यांच्या भेटी झाल्या आहेत काय? उद्धव ठाकरे हक्काचा मतदारसंघ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडणार काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळायला आणखी काही दिवस लागणार आहेत.