एक धाव महिला सुरक्षेसाठी

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे मॅरेथॉन स्पर्धा

| पनवेल | वार्ताहर |

रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल गेली पस्तीस वर्षे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर, पनवेल ग्रामीण तसेच रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात सामाजिक कार्य करीत आहे. त्या अंतर्गत रविवार, दि.17 नोव्हेंबर रोजी पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे महिलांसाठी एक धाव महिला सुरक्षेसाठी रोटरी मॅरेथॉन 2024 चे आयोजन करण्यात आल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष शैलेश पोटे यांनी दिली.

यावेळी रोटरीचे डॉ. गिरीश गुणे, प्रोजेक्ट चेअरमन ॠषिकेश बुवा, अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, प्रसिद्धी विभागाचे संतोष घोडींदे, रोटरी अ‍ॅन्स वृषाली पोटे, ज्योती गडगे आदी उपस्थित होते. या उपक्रमाबाबत माहिती देताना प्रोजेक्ट चेअरमन ॠषिकेश बुवा यांनी सांगितले की, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे पनवेल शहरात उभारलेले महत्त्वाचे प्रकल्प म्हणजे बल्लाळेश्‍वर गणेश विसर्जन तलाव, रोटरी घनदाट जंगल, 15000 विद्यार्थिनींचे मोफत रुबेला लसीकरण, 2000 विद्यार्थिनींचे अनेमिया तपासून त्यांना लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व आहाराविषयी मार्गदर्शन, पॉसिटीव्ह हेल्थ या प्रोजेक्ट अंतर्गत ग्रामीण भागातील 5000 रुग्णांचे रक्त व रक्तदाब तपासणी करून त्यांना आहार मार्गदर्शन करण्यात आले.

श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, मुरुड या तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन पोलिओ लसीकरण मोहिमेत शासकीय कर्मचार्‍यांना सहकार्य करून जनजागृती करून पोलिओ निर्मूलनासाठी सहभाग, पनवेल तालुक्यातील अनेक शाळेत हॅपी स्कूल प्रकल्पांतर्गत विविध साहित्य वाटप, काही शाळांतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, पनवेल तालुक्यातील विविध आदिवासी वाड्यावर पाण्यासाठी छोटे बंधारे व कुपनलिका (बोअरवेल) तयार करून दिल्यात, रोटरी ग्राम सभा योजनेंतर्गत मोहो, कोंबलटेकडी ही गावे दत्तक घेऊन काही समजोपयोगी कामे केली आहेत. त्याचबरोबर क्लबच्या स्थापनेपासून आजपर्यंत वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे आरोग्य दत्तक योजना राबवत आहोत.

कोव्हिडच्या काळात उपजिल्हा रुग्णालयास एक्स-रे, सोनोग्राफी मशीनसह अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आमच्या क्लबचा सिंहाचा वाटा आहे. तसेच कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी लोकांना जागृत करून लसीकरण केंद्र स्थापन केले होते. अनेक या सर्व प्रोजेक्ट साठी आम्हाला पनवेलकर नागरिकांची वेळोवेळी साथ मिळत आहे. अनेक कंपन्या त्यांच्या सीएसआर फंडातून मदत करत आहेत. तशाच प्रकारे हा महिलांसाठी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तर या उपक्रमाची माहिती देताना डॉ. गिरीश गुणे यांनी सांगितले की, दोन गटामध्ये हा उपक्रम घेण्यात आला असून, त्यामध्ये 3 किलोमीटर धावण्यासाठी 450 रुपये प्रवेश फी आहे. तर 5 किलोमीटर धावण्यासाठी 650 रुपये प्रवेश फी आहे. यामध्ये सहभाग घेणार्‍या स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल, ब्रेकफास्ट आदी उपलब्ध राहणार आहे. या उपक्रमाचे प्रायोजक ओरियन मॉल हे आहेत. यासाठी शालेय विद्यार्थिनीसुद्धा सहभाग घेऊ शकतात. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि सेलिब्रीटींसाठी एक किलोमीटरची स्पर्धासुद्धा ठेवण्यात आली आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी उतरावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Exit mobile version