। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील शिवशंभो नाका परिसरात कोस्टल गार्ड कार्यालयासमोरील सर्व्हिस रोडवर धावत्या खाजगी कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार सर्व्हिस रोडवरून जात असताना वाहनातून अचानक धूर निघू लागला. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. काही क्षणांतच आगीने कारला वेढले. घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक पोलिसांनी तात्काळ अग्निशामक दलाशी संपर्क साधला आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवले. काही वेळातच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि पाण्याच्या माऱ्याने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे आग आणखी पसरून मोठी दुर्घटना होण्याचा धोका टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून वाहनातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेतल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी टळली. कारला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत अधिक तपास सुरू आहे. वाहतूक पोलीस आणि अग्निशामक दलाच्या तत्पर कार्यवाहीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
