| पोलादपूर | प्रतिनिधी |
शहरातील ग्रामदैवत श्रीकाळभैरवनाथ जोगेश्वरी देवस्थान ट्रस्टकडे परंपरेनुसार दहिहंडीचे सर्व हक्क असून दंहीहंडी उत्सवाला कधीही गालबोट लागलेले नाही. सुरक्षिततेची ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून कायम आहे. यंदाही 12 नगरांसह 1 महिला मंडळाच्या गोविंदा पथकांनी तब्बल 25 दहीहंड्या फोडल्या आहेत.
दरवर्षीप्रमाणे श्रीकाळभैरवनाथ मंदिरामधील दहीहंडी फोडून दुपारी गोविंदा पथके पोलादपूर शहरात निघतात. यासाठी 41 जणांची एक दक्षता कमिटी आणि 45 जणांची गोविंदा उत्सव पंच कमिटीची निवड करण्यात आली असून अध्यक्षाची निवड दहीहंडी सणापुरतीच करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच बाबूराव महाडीक यांनी एका पत्रकाद्वारे दिली.
दहिहंडी फोडण्याचे नियम, 4 थरांपेक्षा अधिक उंचीवर दहिहंडी बांधल्यास खाली घेण्यात येईल, नागरिकांनी नियम आणि संयम न पाळल्यास कमिटीचा निर्णय मान्य करावा लागणे, घातक रंगांचा वापर न करणे, नशापाणी करून सहभागी होऊ नये, दहिहंडीला बक्षिसाची रक्कम न बांधता पंचकमिटीकडे देण्यात यावी, असे अनेक नियम करण्यात आले होते. यावेळी जाखमातानगर, सैनिक नगर, गोकुळनगर, साईनाथनगर, तांबडभुवन, तांबडभुवन मित्र मंडळ, जोगेश्वरी गाडीतळ, शिवाजीनगर, सिध्देश्वरआळी, स्वामी परमानंद मठगल्ली, आनंदनगर, भैरवनाथनगर आणि काळभैरवनाथनगर अशा 12 नगरांनी पोलादपूर शहरातील 23 दहीहंड्या आणि महिला मंडळाने 2 दहीहंडया फोडल्या आहेत.