। पाली/बेणसे । वार्ताहर ।
विळे येथील गणेश वरवटकर यांच्या घरामध्ये मंगळवारी (दि.8) रात्री 10 वाजताच्या सुमारास एक खवले मांजर शिरले होते. या खवले मांजराला येथील प्रणिमित्र ओमकार नलावडे व वरचीवाडी ग्रामस्थ युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुखरूप पकडले आणि वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
दरम्यान, खवले मांजर घरात आल्याची माहिती वरचीवाडी ग्रामस्थ युवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि ओमकार नलावडे यांनी माणगाव वनविभागाला कळवली होती. यानुसार वनविभागाचे कर्मचारी किरण जाधव घटनास्थळी पोहचले. यांनतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी खवले मांजराला पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.