तळा तालुक्यातील पीक उत्पादन वाढणार
। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील भातशेती व नाचणी पिकाचे शिवार पिवळे रंग परिधान करू लागले असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तालुक्यात भातशेतीच्या लोंबी तयार होऊन भातशेती पिकायला लागून कापणी योग्य झाली आहे. यातच परतीचा पाऊस पडत असल्याने कापणीचा प्रवास लांबेल की काय, असा प्रश्न बळीराजाला पडत आहे. सध्यस्थितीत काही भागात रानटी डुक्करांनी शेतीचे नुकसान केल्याचे चित्र आहे. आता अंदाजे तालुक्यात 40 टक्के शेती कापणी करण्यायोग्य झाली असून या हंगामात अंदाजे 1 हजार 200 हेक्टरपर्यंत क्षेत्रात भात लागवड करण्यात आली आहे. याचसोबत नाचणीच्या पिकाची देखील लागवड करण्यात आली असून नाचणीचे पिकही जोमाने आले आहे.
तळा तालुक्यातील विविध भागात अनेक शेतकर्यांनी कृषी विभाग व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरटी पद्धत व तंत्रज्ञान या यांत्रिक पद्धतीने भातशेतीची लागवड केली आहे. त्याचा एक चांगला फायदा शेतकर्यांना होणार आहे. यावर्षी तालुक्यातील पडलेला पाऊस हा शेतीयोग्य पडल्याचे शेतकरी वर्गातून सांगितले जात आहे. यामुळे भाताचे कणीस जोमाने वाढले आहे. कणसातील दाणे भरण्याची भाताची प्रक्रिया सुरू असून कणीस पिवळे व दाणेदार झाले आहे. काही दिवसांत सर्व शेती पिवळी होऊन कापणी योग्य होईल.
यावेळी, शेतकर्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, यावर्षी भातशेती चांगली असून भाताचे उत्पादन मागील वर्षापेक्षा वाढेल. भातशेती चांगली झाली असून आता कापणीला सुरूवात करणार आहोत. फक्त अखेरच्या क्षणी कापणी, बांधणी, झोडणीच्यावेळी अवकाळी पाऊस पडू नये. यावर्षीचा भातशेतीचा हंगाम चांगला असून शिवाराने पिवळा शालू परिधान केले आहे. यावर्षी शेतीत उत्पन्न चांगले मिळेल, अशी आशादेखील शेतकर्यांकडून व्यक्त केली जात आहे.







