रायगडमध्ये दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’ अशा जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्तांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी दीड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. बुधवारी जिल्हाभरामध्ये गणरायाचे आगमन झाले होते. गणेश विसर्जन शांततेत व्हावे यासाठी पोलिसांनी, तर सुव्यवस्थित व्हावे यासाठी स्थानिक प्रशासनाने जय्यत तयारी केली होती.

सुतारवाडीत बाप्पांचे विसर्जन
सुतारवाडी येथील दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन भक्तीभावाने ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. सुतारवाडीप्रमाणे येरळ, सावरवाडी, धगडवाडी, ढोकळेवाडी, दुरटोली, कामत, विजयनगर, जामगाव, खैरवाडी, वाळंजवाडी, जाधववाडी, पथरशेत, जावटे, कुडली, आंबिवली आदी ग्रामीन भागातील दीड दिवसांच्या बाप्पांना निरोप दिला.

आंबेतमध्ये बाप्पांची मिरवणूक
दोन वर्षांच्या कालावधीनंतर निर्बंधांशिवाय अशा गणेशोत्सवात रायगडकरांनी मोठा उत्स्फूर्त असा सहभाग घेत बाप्पाचे घरोघरी आगमन पार पाडले. छोट्यांपासून ते घरातील ज्येष्ठ नागरिकांचाही या गणपती आगमनातील आनंद हा शिगेला पोहचलेला पहायला मिळाला. गेल्या दोन वर्षांत आलेल्या मर्यादा पाहता यंदा गणपतीचे आगमन मोठ्या उत्साहात झाले खरे. पण, दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना पुढल्या वर्षीही लवकर या असाच जयघोष लहानांपासून थोरांकडून झाला. म्हसळा तालुक्यातील आंबेत विभागातदेखील शंभरहून अधिक बाप्पांचे विसर्जन सावित्री नदीत करण्यात आले. यावेळी गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला अशा घोषणा देत बाप्पाला निरोप देण्यात आला.

रसायनीत चोख पोलीस बंदोबस्त
मोहोपाडा रसायनी परिसरात दिड दिवसांच्या गणरायाला मनोभावाने निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत लहान मुले, महिलांनी गणरायाच्या गाण्यांवर थिरकत मोहोपाडा ते तलाव गणेशाच्या जयघोषात दीड दिवसांच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक काढली. यावेळी बाप्पाला निरोप देण्यासाठी मोहोपाडा गावातील सर्वांनी सहभाग दाखविला. सायंकाळच्या सुमारास मोहोपाडा तलाव, रिस पूल, पाताळगंगा नदी आदी ठिकाणी गणराया निरोप देण्यात आला. यावेळी विसर्जंनस्थळी रसायनी पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता.

कुसुंबळेत भक्तीमय वातावरण
कुसुंबळे-कातळपाडा येथील दीड दिवसांच्या गणपतींचे मोठ्या उत्साहपूर्ण, काहीशा जड अंतःकरणाने व भावपूर्ण वातावरणात कातळपाडा येथील तलावामध्ये विसर्जन करण्यात आले. यावेळी तलावात कोणत्याही प्रकारचे प्लास्टिक व फुले न टाकण्याची जबाबदारी गावातील प्रत्येक नागरिकाने घेतली, हे विशेष कौतुकास्पद ठरले. यावेळी भक्तीगीते गात भक्तिमयी वातावरणात परिसरातील लोकांनी एकत्रितरित्या ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत जड अंतःकरणाने बाप्पाला अखेरचा निरोप दिला.

खांब येथे बाप्पाचा जयघोष
खांब रोहा येथे दीड दिवसाचे गणरायांना मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जनाच्या वेळी पावसाने चांगलीच उघडीप घेतल्याने गणेशभक्तांच्या उत्साहात अधिकच भर पडली. दीड दिवसांच्या गणपतींची संख्या मोठी असल्याने विसर्जनाच्या वेळी रस्त्यावर व विसर्जनाच्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर गणेश भक्त व भगिनींची गर्दी दिसून येत होती. विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडूनही पुरेशी खबरदारी घेतली असल्याचे पहावयास मिळाले.

माथेरानमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप
‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात भक्तीमय वातावरणात दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. माथेरानमध्ये दीड दिवसांचे एकूण 32 गणपती बाप्पा विराजमान होते. सायंकाळी ठीक 5 वाजता गणरायाची स्वारी निघाली. विसर्जनाच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या गणरायाला निरोप देण्यासाठी माथेरानमधील कोकण वासीय समाजाच्या वतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. या सर्व परिसरात येथील स्थानिक प्रशासनाने दोन ते चार दिवस अगोदरपासून सर्व तयारी पूर्ण केली होती. यामध्ये मिरवणुकीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले होते. रस्त्यांवर सर्वच ठिकाणी आणि विसर्जनाच्या ठिकाणी लाईटची सोय योग्य पद्धतीने करण्यात आली होती.तसेच स्थानिक पोलीस प्रशासनानेदेखील मिरवणुकीत आणि विसर्जनाच्या ठिकाणी योग्य तयारी केली होती. अगदी आनंदाने व भक्तिमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.

गडब येथे मिरवणुकीने विसर्जन
गडब येथे तब्बल 400 चे वर दीड दिवसांचे बाप्पा विराजमान झाले होते. मंगल पूजा आरत्यांचा जल्लोश, भजन, नाचगाणी, गप्पाटप्पा, पाहुण्याची वर्दळ, घरात गोडधोड पदार्थ, फराळ, नवीन कपडे, पत्याचे डाव, उखाणे. डिजेच्या तालावर थीरकने पाच दिवस चाललेली मौजमस्तीला अखेर बाप्पाला निरोप देताना सर्वाना गहीवरुन आले. अखेर शेवटच्या मंगल आरतीनंतर दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.

खालापूर येथे बाप्पाला निरोप
खालापूरमध्ये दीड दिवसांच्या बाप्पांचे भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. खोपोली नगरपरिषद आणि रोटरँक्ट क्लब खोपोली यांच्या विद्यमाने फिरते कृत्रिम तलाव करून घराजवळच गणेश विसर्जन करण्यात आले. तसेच खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी पात्रात, खोपोली शहरातील पुरातन काळातील पेशवेकालीन तलाव येथे कृत्रिम तलाव, खालची खोपोली, शिळफाटा येथील विसर्जन घाटावर विसर्जन करते वेळी अनेक गणेश भक्तांचे डोळे पाणावले दिसत होते.

माणगावात बाप्पाचा जयजयकार
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला’च्या गजरात माणगावात दीड दिवसांच्या गणपतींना भावपूर्ण निरोप देत विसर्जन करण्यात आले. माणगावसह तालुक्यात बुधवारी गणरायांचे वाजत-गाजत उत्साहात आगमन झाल्यावर गुरुवार, दि.1 सप्टेंबर रोजी दुपारपासूनच गणेशभक्तांनी दीड दिवसांचे गणपती विसर्जनासाठी घराबाहेर काढले. सायंकाळी मोठ्या संख्येने दिड दिवसांचे गणपती विसर्जनासाठी आले होते. यावेळी माणगाव नगरपंचायतीतर्फे स्वागत करण्यात आले. नगरपंचायतीतर्फे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. माणगाव काळ नदी पात्रात गणरायांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

पनवेलमध्ये गणपतींचे विसर्जन
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, पनवेल महानगरपालिका व पनवेल शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था यांनी तयार केलेल्या रोटरी गणेश विसर्जन तलावात दीड दिवसाच्या गणपतींचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, अनिल ठकेकर, डॉ. गिरीश गुणे, दीपक गडगे, यांचेसह अनेक रोटरी सदस्य सर्व गणेश भक्तांना नियोजनबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करीत होते.या प्रसंगी विरोधीपक्ष नेते प्रितम म्हात्रे, रुचिता लोंढे, प्रीती जार्ज, गणेश कडू आदी मान्यवर उपस्थित होते. पनवेलमधील हजारो गणेशभक्तांसह काही परदेशी पाहुण्यांनी या गणेश विसर्जन सोहळ्याचा आनंद घेतला.

सुधागडात दिड दिवसाच्या बाप्पांना निरोप
’गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकरच या, अशा जयघोषात सुधागडकरांनी दिड दिवसांच्या बाप्पांना गुरूवारी निरोप दिला. सायंकाळपर्यंत अनेक घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पाली पोलिसांकडू चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाली, पेडली, जांभुळपाडा, परळी, करचुंडे अंबानदीत येथे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Exit mobile version