। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या,’ अशा जयघोषात रायगडात दीड दिवसांच्या गणरायाला गुरुवारी (दि.1) भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी समुद्रकिनारे, नदी, तलाव आदी ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यात बुधवारी सव्वा लाख गणेशमूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यापैकी 25,728 दीड दिवसांच्या बाप्पांचे विधिवत विसर्जन करण्यात आले. यामध्ये 12 सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचाही समावेश होता.

दोन वर्षानंतर गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असल्याने गणेेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसून येत आहे. दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठीही भाविकांचा उत्साह प्रचंड दिसून आला. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने सामूहिकरित्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले.
अलिबाग नगरपालिकेच्यावतीने समुद्रकिनारी गणेशभक्तांसाठी विशेष सोय करण्यात आली होती. याशिवाय प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्यांचे संकलनही केले जात होते. नागरिकांनीही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत पालिकेच्या निर्माल्य कुंडात निर्माल्य जमा केले.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अलिबाग पोलिसांबरोबरच जीवरक्षकांचे पथकही तैनात करण्यात आले होते. सार्वजनिक वाचनालयापासूनच सायलेन्स झोनचा परिसर सुरु असल्याने पोलिसांच्या आवाहनानुसार गणेशभक्त देखील शांततेत बाप्पांच्या मूर्ती विसर्जनासाठी नेत होते.