चौलमळा येथील खारीच्या तलावात विसर्जन
| चौल | प्रतिनिधी |
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा गर्जनेत, ढोल-ताशांच्या निनादात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त उत्साहात दीड दिवसांच्या गणपतींचे बुधवार, दि.20 रोजी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देऊन भावपूर्ण आणि जड अंतःकरणाने चौलमळा येथील खारीतील तलावात विसर्जन करण्यात आले.
मंगळवारी वाजत-गाजत, ढोल-ताशाच्या गजरात आगमन झालेल्या बाप्पांनी, दीड दिवसांचा पाहुणचार घेतल्यानंतर बुधवारी आपल्या भक्तांचा निरोप घेतला. अलिबाग तालुक्यातील चौलमळा गावातील गणपतींचे विसर्जन वर्षानुवर्षे गावाच्या खारीतील तलावात विसर्जन करण्याची परंपरा आजही अबाधित आहे. विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भक्तांना-ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी गणेशोत्सवाच्या आठवडाभर आधीच या तलावाची ग्रामस्थांकडून श्रमदान करुन साफसफाई करण्यात आली होती. त्यामुळे विसर्जनासाठी कोणताही अडथळा आला नाही. दरम्यान, रिद्धी-सिद्धी आणि बुद्धीची देवता गणपती बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरतो. त्याचे आगमन जीवनातील दुःख दूर करतो, अशी भावना विसर्जनासाठी उपस्थित असलेले गावचे प्रमुख रवींद्र घरत यांनी व्यक्त केली. या विसर्जन सोहळ्या शेकडो ग्रामस्थ खारीतील तलाव परिसरात उपस्थित होते.