टीम इंडियावर आली ‘गंभीर’ वेळ

। पुणे । वृत्तसंस्था ।

न्यूझीलंडच्या संघाने दुसरा कसोटी सामना जिंकत तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी खिशात घातलीये. पुण्याच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने तिसर्‍या दिवशीच 113 धावांनी विजय मिळवत ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली. याआधी बंगळुरु कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं 8 विकेट्सनी विजय मिळवला होता.

गौतम गंभीर याने प्रशिक्षक पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर टीम इंडियाची ही दुसरी कसोटी मालिका होती. या कसोटी मालिकेत जवळपास 12 वर्षांनी टीम इंडियावर मायदेशात कसोटी मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. यासह गौतम गंभीरसोबत कमालीचा योगायोग जुळून आला. हा योग गंभीरचं नशीबच निघालं फुटकं, असा सीन निर्माण करणारा आहे.

याआधी भारतीय संघाने 2012-13 मध्ये मायदेशात कसोटी मालिका गमावली होती. योगायोग हा की, त्यावेळीही गौतम गंभीर हा टीम इंडियाचा भाग होता. फरक फक्त एवढाच की, आज तो टीम इंडियाचा कोच आहे अन् त्यावेळी तो खेळाडूच्या रुपात संघात दिसला होता. 12 वर्षांपूर्वी भारतीय संघाने इंग्लंड विरुद्धची 4 सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने गमावली होती. गौतम गंभीरशिवाय विराट कोहली आणि आर अश्‍विनही मालिका गमावणार्‍या संघाचा भाग होते.
हॅन्स्री क्रोनिएच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला घरच्या मैदानात रंगलेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी मात दिली होती. त्यानंतर 2004 मध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून टीम इंडियावर 2-1 अशा पराभवाची नामुष्की ओढावली होती. या मालिकेत काही सामन्यात रिकी पाँटिंग तर काही सामन्यात अ‍ॅडम गिलख्रिस्ट कांगारू संघाच्या कॅप्टन्सीची धूरा सांभाळताना दिसून आले होते. 2012मध्ये अ‍ॅलेस्टर कुकच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने टीम इंडियाला 2-1 अशी मात दिल्यानंतर 12 वर्षांनी टॉम लॅथमच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड संघासमोर टीम इंडियावर घरच्या मैदानात मालिका गमावण्याची नामुष्की आली.

Exit mobile version