| उरण | प्रतिनिधी |
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया व उत्तर प्रदेश तायक्वांदो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल, के. डी. सिंह बाबू स्टेडियम, लखनौ (उत्तर प्रदेश) येथे दि. 12 ते 14 जून दरम्यान राष्ट्रीय पंच सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. या सेमिनारसाठी आंतरराष्ट्रीय प्रथम श्रेणीचे रेफरी व 7 वी डिग्री ब्लॅक बेल्ट सुभाष पाटील हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते. या सेमिनारसाठी देशभरातील 200 हून अधिक तायक्वांदो खेळाडू व पंचांनी सहभाग नोंदविला.
2026 साली वर्ल्ड तायक्वांदोने लागू केलेल्या नवीन नियमांचा अभ्यास सुभाष पाटील यांनी इस्वातिनी (दक्षिण आफ्रिका) येथे जाऊन प्रत्यक्ष प्रशिक्षणाद्वारे केला असून, भारतात त्या नियमांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. या नव्या नियमांवरील हे त्यांचे पाचवे राष्ट्रीय सेमिनार होते. तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियामध्ये या नियमांचा सखोल अभ्यास करणारे ते एकमेव आंतरराष्ट्रीय पंच आहेत.
उत्तर प्रदेश तायक्वांदो असोसिएशनचे महासचिव राजकुमार यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांनी विविध देशांमध्ये जाऊन तायक्वांदो विषयक सेमिनार घेतले असून, ते प्रथम श्रेणीचे आंतरराष्ट्रीय पंच आहेत. राजकुमार पुढे म्हणाले की, तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियामध्ये सुभाष पाटील अतिशय प्रभावीपणे कार्य करत आहेत. स्वतः सातत्याने उपस्थित राहून ते भारतीय खेळाडू व पंचांना नवीन नियमांची माहिती देतात, ज्याचा देशातील तायक्वांदो क्षेत्राला मोठा लाभ होत आहे. त्यांनी उत्तर प्रदेशातील पंचांना उत्कृष्ट प्रशिक्षण देत विविध देशांतील अनुभवही सांगितले, त्यामुळे सहभागी पंचांना नियमांचे सखोल ज्ञान प्राप्त झाले.
या उल्लेखनीय योगदानाबद्दल उत्तर प्रदेश तायक्वांदो असोसिएशनतर्फे सुभाष पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना अयोध्या धाम येथील श्री भगवान रामलल्ला यांची पवित्र मूर्ती भेट देऊन गौरविण्यात आले.







