सरकारी जमीनी विकल्याचा आरोप
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चाणजे परिसरात वनजमीन महाघोटाळ्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शासनाच्या मालकीच्या वनजमिनी खासगी व्यक्तींच्या नावावर करून त्या सिडकोला विकण्यात आल्याचा आरोप होत असून, या व्यवहारातून हजारो विकसित प्लॉट, कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फायदा आणि राजकीय-अधिकारी-दलाल साखळीचा मोठा खेळ उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चाणजे परिसरातील जमिनींचे भाव विमानतळ, जेएनपीए, अटल सेतू आणि वाढत्या नागरीकरणामुळे सोन्याच्या भावाने वाढले. या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी काही भूमाफिया, दलाल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी थेट वन विभागाच्या जमिनींवरच डल्ला मारल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या मालकीच्या जमिनींच्या नोंदींमध्ये संशयास्पद फेरफार करण्यात आले आहेत. महसूल अभिलेखांमध्ये बदल करून सातबारा उताऱ्यांवर खासगी व्यक्तींची नावे चढविण्यात आली. त्यानंतर या जमिनींचे व्यवहार करून त्या सिडकोच्या घशात घालण्यात आल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे या व्यवहारांच्या बदल्यात संबंधितांना विकसित भूखंड, हजारो प्लॉट आणि कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या कथित घोटाळ्यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सिडकोच्या एका अधिकाऱ्याने स्वतःच्या पत्नीच्या नावावर जमीन खरेदी केल्याची माहिती समोर येत आहे. नंतर संबंधित जमीन शासकीय असल्याचे समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जर हा दावा खरा असेल तर हा केवळ जमीन व्यवहाराचा विषय नसून हितसंबंधांच्या संघर्षाचा आणि सत्तेच्या गैरवापराचा गंभीर प्रकार ठरू शकतो. याहून गंभीर आरोप म्हणजे एका प्रभावशाली राजकीय नेत्याने जमीन न घेता तब्बल 60 लाख रुपये घेतल्याची माहिती एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्याने दिल्याची चर्चा सुरू आहे. या पैशांचा व्यवहार नेमका कशासाठी झाला? कोणाला वाचवण्यासाठी झाला? आणि त्यामागे कोणते राजकीय संरक्षण होते? असे प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.







