आक्षीमध्ये शेकाप, काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला

विकासकामांच्या जोरावर बाजी मारणार

| अलिबाग | प्रतिनिधी |

आक्षी, ता.अलिबाग ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा नारळ सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत फोडण्यात आला. ग्रामपंचायतीवर पुन्हा आमचीच सत्ता येणार असा दावा आघाडीच्यावतीने करण्यात आला आहे.

येथील साखर गणपती मंदिरात या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी शेकाप ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, माजी जि.प.सदस्य संजय पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, काँग्रेस नेते उमेश ठाकूर यांच्यासह सरपंचपदाच्या उमेदवार रश्मी पाटील यांच्यासह सर्व उमेदवार, माजी सरपंच नंदकुमार वाळंज, प्रभाकर राणे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी द्वारकानाथ नाईक, संजय पाटील यांनी आक्षीमध्ये शेकापच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात विकासाची कामे करण्यात आलेली आहेत. भविष्यातही आणखी विकासकामे करण्याचा आमचा संकल्प आहे. तो तडीस जाण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे सुचित केले. उमेश ठाकूर यांनीही विकासासाठी शेकाप, काँग्रेस आघाडीलाच निवडूण द्यावे, असे आवाहन मतदारांना केले.


प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर उपस्थितांनी गावामध्ये प्रचारफेरी काढून मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी शेकापचा विजय असो.. येऊन येऊन येणार कोण, शेकापशिवाय आहे कोण.. लाल सलाम, लाल सलाम.. अशा घोषणांनी आक्षीचा परिसर दणाणून गेला. दि.18 डिसेंबरला येथे मतदान होत आहे.

आक्षीचा मतदार हा जागरुक आहे. या परिसरात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासकामे केलेली आहे. पुढील काळातही आम्हाला आक्षीसाठी विविध सुविधा पुरवायच्या आहेत. यासाठी मतदारांनी जागरुकपणे शेकापलाच मतदान करावे.

संजय पाटील
माजी जि.प. सदस्य
Exit mobile version