। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा देशाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सामान्य जनतेला तेल कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. हिवाळ्याच्या हंगामात वाढलेली मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतीमुळे एलपीजी गॅसची किंमत 14 रुपयांनी महागली आहे.
देशभरातील तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करतात. आजही गॅस सिलिंडरचा नवीन दर अपडेट करण्यात आला असून गरूवारी (दि.१) पहाटे एलपीजी ग्राहकांना मोठा धक्का बसला. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या दिवशीच तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे बजेट बिघडवले आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 14 रुपयांनी वाढ केली. तर] घरगुती एलपीजी गॅसच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
चार महानगरांमधील एलपीजी सिलिंडरच्या किंमती फेब्रुवारी महिना सुरू होताच तेल आणि गॅस कंपन्यांनी व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली आहे. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर वाढीनंतर 1,769.50 रुपयांवर पोहोचला. तर मुंबई 1,723.50 रुपये, कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,887 रुपयांवर पोहोचली आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस 1,937 रुपयांना उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी 1 मार्च रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 1,103 रुपये होती ज्यात ऑगस्टमध्ये 200 रुपयांची कपात करण्यात आली. आणि तेव्हापासून घरगुती गॅस सिलिंडर फक्त 903 रुपयांना मिळत आहे. थंडीच्या हंगामात मागणीत वाढ नोंदवली गेली. तसेच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींवरही परिणाम झाला, ज्यामुळे व्यावसायिक सिलिंडर पुन्हा एकदा महागला आहे.






