जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याचा ढिगारा
| अलिबाग | प्रतिनिधी |
स्वच्छता राखण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने केले जाते. मात्र, ‘दुसऱ्या शिकवे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’ अशी अवस्था सध्या अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाची झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीलगत मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचा ढिगारा साचल्याचे चित्र समोर आले आहे. जुनी कागदपत्रे, विविध प्रस्ताव आणि खराब झालेल्या फाईली यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत प्रशासन उदासीन ठरल्याने प्रशासनाकडून केवळ स्वच्छतेचा दिखावा केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता राखण्याचे प्रयत्न केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आणि आवारात अनेक वेळा कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. पर्यावरणाचा समतोल राखणे, नागरिकांचे आरोग्य सुदृढ ठेवणे आणि स्वच्छ परिसर निर्माण करणे यासाठी जिल्हा प्रशासन स्तरावर सातत्याने बैठका घेतल्या जातात. विविध उपक्रम, अभियान आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी करतात. तालुका आणि गाव पातळीवर स्वच्छतेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेशही दिले जातात. मात्र, हेच प्रशासन स्वतःच्या कार्यालयाच्या आवारात स्वच्छतेबाबत अपयशी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याचा ढिगारा साचलेला असून, काही जुनी व खराब झालेली कागदपत्रे, दाखले आणि कार्यालयीन नोंदी यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता थेट कार्यालयाच्या आवारात टाकून ठेवण्यात आली आहेत. हा कचरा अनेक दिवसांपासून तसाच पडून असल्याने दुर्गंधी पसरली असून परिसराचे विद्रूपकरण झाले आहे. विशेष म्हणजे, कचऱ्याचा ढिगारा असलेल्या परिसरात भूमी अभिलेख कार्यालयासह बाजूला वन विभागाचे कार्यालय असून, जिल्हा माहिती कार्यालयदेखील याच परिसरात आहे. त्यामुळे हा भाग नेहमीच अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या वर्दळीचा असतो. अशा ठिकाणी कचऱ्याचा ढिगारा साचल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये पाल, विंचू तसेच अन्य विषारी प्राण्यांचा वावर वाढल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
तथापि, प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या या आश्वासनांची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, स्वच्छतेबाबत प्रशासनाने आधी स्वतः आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नुकतीच परिसराची सफाई करण्यात आली होती. काही खराब झालेले कागदपत्रे आणि जुनी नोंदी फेकून देण्याबरोबरच त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी एकत्रितपणे जमा करण्यात आली आहेत. ही कागदपत्रे लवकरच येथून हटवली जातील.
-चंद्रसेन पवार,
तहसीलदार






