लाडकी बहीण, शेतकऱ्यांना दगा; विरोधकांकडून सरकारवर घणाघात
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि. 6) विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला. मात्र, या अर्थसंकल्पातून विकासाची दिशा मिळण्याऐवजी विधानसभा निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याची टीका विरोधकांनी केली आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत 1500 रुपयांचा हप्ता 2100 रुपये करण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील तमाम बहिणींची मते मिळवली, तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात दोन लाखांपर्यंतची मर्यादित आणि तकलादू कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची सरकारने फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा आणि आकड्यांचा पाऊस असला तरी सर्वसामान्यांच्या हातात काहीच पडणार नाही. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि महिलांसाठी ठोस उपाययोजना नसल्याने हा विकासाचे मृगजळ दाखवणारा आणि घोषणांचा फुगा ठरलेला अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली आहे.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे
राज्याची बिकट परिस्थिती असताना कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प आहे. त्यातून राज्याचे काहीच हित साधले जाणार नाही. ठेकेदारांसाठी मात्र ठोस योजना करण्यात आल्याचे दिसून येते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अगदी सविस्तर, कुठून कुठे मार्ग होणार आहे? किती कोटींचा होणार आहे? या योजना आहेत. मात्र कामगार आणि शेतकरी यांच्यासाठी मात्र हा फसवा अर्थसंकल्प आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
राज्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. खरो-खरच शेतकऱ्यांचे भले करायचे असेल, तर, पात्र-अपात्र, हा जो काही शाब्दिक खेळ केला आहे, तसा करू नये. अर्थसंकल्पात 2047 चा वारंवार उल्लेख झाला, तर आताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का? तर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे की, या तारखेपर्यंत आम्ही कर्जमुक्ती पूर्ण करू, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.
साधारणपणे पाच वर्षांपूर्वी कालबाह्य पद्धतीने शेतकऱ्यांची 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली होती. त्यावेळी पात्र-अपात्र, अशा काही अटींचं जंजाल नव्हतं. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती केली होती. 3 कोटी वृक्ष लावणाऱ्या सरकारकडे जमीन कुठे आहे? जेव्हा एखादा प्रोजेक्ट उभारायचा असेल तर तुम्ही बेघर करता.. मग हे वृक्ष लावण्यासाठी जमीन कुठून आणणार आहे? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. गुजरात-मुंबई बुलेट ट्रेन येतेय. पण, मुंबईचा माणूस गुजरातला जाऊन करणार काय? 2047 पर्यंत भाजप टिकणार नाही फक्त कर्जाचा डोंगर उभारत आहे, अशी टीका ठाकरेंनी केली. बाळासाहेब ठाकरे स्मारकांचा अध्यक्ष मी आहे. निधी नाहीय. आणि किती वेळात ते पूर्ण होणार हे ते सांगत असल्याचे ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी
राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पिककर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केली. म्हणजे शेतकरी कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास पात्र शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी कोकणाचा आवर्जून उल्लेख करत, 'ही बाब कोकणासाठी महत्त्वाची आहे कारण कोकणातील लोकं सगळं कर्ज परत करतात' असंही फडणवीस म्हणाले.






