वेलिंग्टनमध्ये धावांचा ‌‘अभिषेक‌’

किवी गोलंदाजांचा फोडला घाम; तिसरा सामना जिंकून मालिका खिशात

| वेलिंग्टन | वृत्तसंस्था |

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अभिषेक शर्माने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना मैदानावर सावरण्याची संधीच दिली नाही. त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने किवी गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. अभिषेकने अवघ्या 38 चेंडूंत 113 धावांची वादळी खेळी साकारली. त्याच्या या स्फोटक शतकाच्या जोरावर भारताने न्यूझीलंडने दिलेल्या 199 धावांच्या लक्ष्याचा अवघ्या 13 षटकांत यशस्वी पाठलाग केला. या विजयासह भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेत मालिका आपल्या नावावर केली.

वेलिंग्टनमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मंगळवारी (दि.27) तिसरा टी-20 सामना खेळवला गेला. यावेळी भारतीय कर्णधाराने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. मात्र, भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्याच षटकात पहिला बळी घेत चांगली सुरुवात केली. त्यानंतर मात्र डॅरिल मिचेलने न्यूझीलंडच्या डावाला चांगली साथ दिली. मिचेलने तुफानी फलंदाजी करत नाबाद 89 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने 20 षटकांत 3 बाद 198 धावा केल्या आणि भारतासमोर विजयासाठी 199 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले.

त्यानंतर 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा सलामीला मैदानात उतरले. भारतीय संघाची सुरुवातच धमाकेदार झाली. दोन्ही सलामीवीरांनी चौफेर फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ईशान किशन दुखापतग्रस्त झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले होते. मात्र, मागील सामन्यात त्याला फारशी कमाल करता आली नव्हती. या सामन्यात मात्र वैभवने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. वैभवने अवघ्या 19 चेंडूंत 45 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला अभिषेक शर्माने तर षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत अवघ्या 38 चेंडूंत 113 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीत 11 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता.

वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा या दोघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर सुरुवातीपासून दबाव टाकला. पॉवरप्लेमध्ये भारताने एकही गडी न गमावता 118 धावा केल्या. या जबरदस्त सुरुवातीमुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला होता. अभिषेक शर्माच्या तुफानी शतकामुळे भारताने 199 धावांचे लक्ष्य अवघ्या 13.2 षटकांत 4 गडी गमावून गाठले.

जागतिक विक्रम मोडले
अभिषेक व वैभव या जोडीने या सामन्यात जागतिक विक्रम मोडले. पहिल्या षटकात 26 धावा कुटून आंतरराष्ट्रीय टी-20तील सर्वात महागडे पहिल्या षटकाच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर या जोडीने अवघ्या 14 चेंडूंत पन्नास धावा पूर्ण केल्या आणि टी-20तील सर्वात वेगाने 50 धावा करणारा भारत हा पूर्ण सदस्य असलेल्या संघांमध्ये अव्वल ठरला. त्यानंतर अभिषेकने 15 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. सलामीला आलेल्या वैभवनेही उत्तुंग षटकार खेचून संघाला 5 षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. आंतरराष्ट्रीय टी-20तील क्रिकेटमध्ये संघाचे हे वेगवान शतक ठरले. तसेच, भारताने पहिल्या 6 षटकांत 118 धावा केल्या आणि या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पॉवर प्लेमधील सर्वाधिक धावा ठरल्या.
38 चेंडूत वादळी खेळी
वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर अभिषेक शर्माने धावांचा धडाका सुरूच ठेवला. त्याने अवघ्या 38 चेंडूंत 113 धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या खेळीत 9 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 297.36 इतका राहिला. अभिषेकने चौफेर फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरशः जेरीस आणले. 10 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेव्हा अभिषेक बाद झाला, तेव्हा भारताची धावसंख्या 178 होती. तत्पूर्वी अभिषेकने अवघ्या 15 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, अर्धशतकावर न थांबता त्याने आपली आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली आणि शतक झळकावले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-20 कारकिर्दीतील चौथे शतक ठरले.
Exit mobile version