। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
नरेंद्र मोदी मंत्रिमंडळातील आणखी एका फेरबदलाचे संकेत मिळाले असून संभाव्य ड्रीम टीम मोदीमध्ये कोण येणार व कोण जाणार याबाबत हाताच्या बोटावर मोजणारे ज्येष्ठ भाजप नेते सोडले तर सारीकडे सुप्त अस्वस्थता आहे.
संभाव्य फेरबदलात महाराष्ट्रातील शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला लॉटरी लागण्याची चिन्हे असून भाजप नेत्यांसाठी अत्यंत कठोरपणे लावले जाणारे ङ्गनिकषफ मोदी यांनी बाजूला ठेवल्यास मुख्यमंत्र्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिल्लीत मंत्रीपद मिळण्याची शक्यता दाट आहे.
टीम मोदी-2 म्हणजेच मोदींच्या दुसर्या कार्यकाळातील ही अखेरची फेररचना असेल, असे मानले जात आहे. मात्र फेरबदल होणार काय, तो कधी होणार व त्यात नेमके काय होणार, या सार्या बाबींविषयी फक्त एका व्यक्तीला (पंतप्रधान) माहिती आहे यावर झाडून सार्यांचे एकमत दिसते.
विशेषतः कर्नाटक, तेलंगण, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या काही खासदारांना अच्छे दिन येऊ शकतात. भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक 16 व 17 जानेवारीला दिल्लीत होत आहे. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ 23 जानेवारीला पूर्ण होणार असला तरी त्यांच्याचकडे भाजपची सूत्रे ठेवली जातील याचे संकेत हिमचल प्रदेशातील भाजप पराभवानंतर मिळाले आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू आहे. त्यामुळे मोदी व अमित शहा यांच्यातील चर्चा पूर्ण झाली तर 15 ते 20 जानेवारी दरम्यान मंत्रीमंडळ फेररचना होऊ शकते.