। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून शिव सर्वेक्षण यात्रा सुरू करण्यात आली होती. यावेळी मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांसाठी नेमणूक केलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. त्यानंतर आता जानेवारीपासून उद्धव ठाकरे मुंबईतील सर्व शाखांना भेट देणार असून शाखाप्रमुखांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान, 26 डिसेंबरपासून शिवसेना ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरू होणार आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. अशामध्ये आता सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून शिवसेना ठाकरे गटानेदेखील आता पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश आले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत मविआला मोठा फटका बसला. मात्र, आगामी महापालिका निवडणुकींमध्ये विधानसभेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मविआचे नेते सावधगिरी बाळगणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अॅक्शनमोडमध्ये आले आहेत.