| पाली/बेणसे | वार्ताहर |
सुधागड तालुक्यातील प्रस्तरारोहक मॅकमोहन हुले व ‘मॅकविला द जंगल यार्ड’च्या प्रस्तरारोहकांची पनवेल जवळील चंदेरी लिंगी प्रस्तरारोहण ही अवघड मोहीम नुकतीच फत्ते केली. या चंदेरी लिंगी प्रस्तरारोहण मार्गास ‘रेस्क्यू ऑफ फ्रेंड‘ असे नाव देण्यात आले होते. हा चढाई मार्ग कठीण श्रेणीमध्ये गणला जातो. यावेळी तब्बल 170 फुट उंच सुळका कृत्रिम आरोहणाद्वारे सर करण्यात आला.
मॅकमोहन हुले यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या मोहिमेत प्रणय पाटील, अभिजीत डिकोस्टा, राम वाघे आदी प्रस्तरारोहक सहभागी झाले होते. मॅकविला द जंगल यार्ड या संस्थेचे हे 7 वे कृत्रिम आरोहण होते.
या प्रस्तरारोहकांनी संध्याकाळी 5 वा. पनवेल, नेरे, शांतीवन, डुंदरे, तांमसई असा प्रवास करत रात्री 8 वाजता त्यांनी ट्रेकला सुरूवात केली. चार तासांत किल्ल्याजवळील गुहेजवळ मुक्कामी राहिले. पहाटे पुन्हा सुळका चढण्यास सुरुवात केली. प्रथम टप्पा आरोहण मॅकमोहन यांनी सुरू केले. त्यांना प्रणय पाटील यांनी सुरक्षा दोर दिला. दुसऱ्या टप्प्यात दोघेही सुळक्यावर पोहोचले. त्यानंतर अभिजीत डिकोस्टा व राम वाघे यांनी क्रॅकमधुन झूमर व सुरक्षादोरच्या साह्याने आरोहण केले.
अवघड चढाई प्रस्तरारोहणासाठी एका झाडाला दोर लावुन लिंगी-कंगोर्यात उतरावे लागते. त्यानंतर प्रस्तरारोहणाला सुरूवात होते. तीन टप्प्यांत आरोहण पूर्ण होते. पहिला टप्पा गवताळ घसरडी, मुरमाड निसरडा कातळ आसल्याने तेथे प्रस्तरात्मक खिळा नाही. 70 फुटावर पहिला खिळा आहे. नंतर दुसऱ्या टप्प्याला सुरवात होते. या मार्गावर 4 खिळे आहेत. 60 फुटांनंतर तिसरा अंतिम टप्पा आहे. तिथे 4 खिळे आहेत. हे कृत्रिम आरोहण असल्याने फ्रेंड्स, पाचर, पेग चा वापर करता येतो.
“रेस्क्यू ऑफ फ्रेंड“ नाव का? मागील वर्षी 3 जानेवारी रोजी गिरिविराज हायकर्सने येथील लिंगी क्र.3 वर तिसऱ्या पिढीच्या नवोदित गिर्यारोहकांनी 8 रिंग बोल्ट, 9 पाचर, 8 फ्रेंड्स ही साधने वापरीत एका नवीनच अवघड मार्गाने सुमारे 170 फूट उंच सुळक्यावर चढाईत यश मिळवले. मोहिमेत चढाई करताना एका क्रॅकमध्ये वापरलेला फ्रेंड्स अडकला व शेवटी मोहीम फत्ते झाल्यावर अथक परिश्रम करून त्यास काढण्यात आले. म्हणूनच या रूटला ‘रेस्क्यू ऑफ फ्रेंड‘ असे नाव देण्यात आले. असे मॅकमोहन हुले यांनी सांगितले.
असा आहे किल्ला किल्ल्यावरील गुहेच्या अलीकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्ले पणाची हीच काय ती खूण. मे 1656 मध्ये शिवरायांनी कल्याण-भिवंडी-रायरीपर्यंतचा सारा मुलुख घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला. अल्प विस्तार, पाण्याची कमी साठवणूक, बांधकामाचा अभाव, मर्यादित लोकांची मुक्कामाची सोय, अतिशय अवघड वाट हे सारे पाहून हा किल्ला नसून एक लष्करी चौकी असेच वाटते. काही जणांच्या मते 7 ऑक्टोबर 1957 रोजी चंदेरी किल्ल्याच्या सुळक्यावर संघटित प्रस्तरारोहणाचा प्रारंभ झाला.
कठीण बेजोड परिसर चंदेरी, म्हसमाळ नवरी, बोयी या डोंगररांगेतील एक व पनवेलच्या प्रभागमंडळाचे मानकरी असणाऱ्या कर्नाळा, प्रबळगड, इरशाळगड, माणिकगड, पेब, माथेरान आणि अशा कितीतरी गडांपैकी एक म्हणजे चंदेरी होय. चंदेरीच्या पायथ्याशी असलेली घनदाट वृक्षराजी, गवताळ घसरडी वाट अन् मुरमाड निसरडा कातळमाथा म्हणजे सह्याद्रीतील एक बेजोड असा हा कठीण परिसर आहे. तामसाई गावाच्या हद्दीत असणारा असा हा दुर्ग प्रस्तरारोहण कलेची आवड असणाऱ्या गिर्यारोहकांचे खास आकर्षण आहे.







